FIFA 2022, Netherlands vs Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक, नेदरलँड्सवर मिळवला थरारक विजय, आता लढत क्रोएशियाशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 08:29 AM2022-12-10T08:29:59+5:302022-12-10T08:30:56+5:30
FIFA 2022, Netherlands vs Argentina: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघानं फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
FIFA 2022, Netherlands vs Argentina: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघानं फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. कतारच्या लुसेल स्टेडियम रंगलेला अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स सामना निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीत सुटला होता. अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं ४-३ असा थरारक विजय साजरा करत उपांत्य फेरी गाठला आणि 'ऑरेंज आर्मी'ला धक्का दिला.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचंच पारडं जड होतं. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने १-० ने आघाडी घेतली होती. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या नहुएल मोलिना यानं लिओनेल मेस्सीनं दिलेल्या पासला गोलचा मार्ग दाखवला आणि संघाला खातं उघडून दिलं. त्यानंतर सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर लिओनेल मेस्सीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर सुरेख गोल करत संघाला २-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.
नेदरलँड्सनं अखेरच्या क्षणाला धक्का देण्याचं आपलं तंत्र कायम राखत दोन गोल डागले आणि सामन्यात बरोबरी साधली. सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या वेगहॉर्रस्टनं गोल केला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत डेनेझेल डमफ्राइजनं दुसरा गोल करत नेदरलँड्सला सामन्यात बरोबरीत आणले आणि अर्जेंटिनाला धक्का दिला. अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची जागा आता तणावानं घेतली होती. सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानं पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाल लागणार हे निश्चित झालं.
संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाची पकड असल्याचं पाहायला मिळालं असलं तरी अखेरच्या क्षणी नेदरलँड्सनं कमबॅक केल्यानं सामना रोमांचक वळणावर येऊन ठेपला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं ४-३ अशा फरकानं विजय प्राप्त करत उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाची लढत क्रोएशियाशी होणार आहे.