फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:52 AM2017-10-09T00:52:56+5:302017-10-09T00:53:09+5:30
बलाढ्य फ्रान्सने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘इ’ गटामध्ये धमाकेदार विजयी सलामी देताना न्यू कॅलेडोनियाचा ७-१ असा फडशा पाडला.
गुवाहाटी : बलाढ्य फ्रान्सने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘इ’ गटामध्ये धमाकेदार विजयी सलामी देताना न्यू कॅलेडोनियाचा ७-१ असा फडशा पाडला. दुसरीकडे ‘फ’ गटात बलाढ्य इंग्लंडनेही दणदणीत विजय मिळवताना चिलीचा ४-० असा धुव्वा उडवला.
इंदिरा गांधी स्टेडियमवर फ्रान्सने जबरदस्त धमाका करताना स्पर्धेत पदार्पण करणाºया न्यू कॅलेडोनियाला फुटबॉलचे धडेच दिले. फ्रान्सच्या धडाक्यापुढे गोंधळलेल्या कॅलेडोनियाकडून दोन स्वयंगोल झाले. बेर्नार्ड इवा आणि कियाम वेनेस्सी यांनी अनुक्रमे ५ व्या आणि ४३ व्या मिनिटाला आपल्या गोलजाळ्यात चेंडू धाडून फ्रान्सच्या विजयामध्ये हातभार लावला. तसेच, अमिन गौइरी याने १९ व्या आणि ३३ व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सच्या विजयात मोलाचे योगदान दिले. क्लॉडिओ गोम्स, मॅक्सेन्स काक्वेरेट आणि विल्सन इसिडोर यांनीही प्रत्येकी एक गोल करताना फ्रान्सच्या शानदार विजयामध्ये हातभार लावला. दरम्यान, अखेरच्या मिनिटाला कॅलेडोनियाने आक्रमक खेळ केला खरा, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला. अखेरच्या मिनिटाला सिद्री वेडेंगेस याने एक गोल नोंदवून संघाचा एकमेव गोल केला.
दुसरीकडे, कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर स्टार खेळाडू जेडेन सांचो याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर इंग्लंडने चिलीची ‘गरमी’ ४-० अशी उतरवली. सांचोने ५१ व्या आणि ६० व्या मिनिटाला गोल करून चिलीचे मानसिक खच्चीकरण केले. त्याआधी हडसन ओडोइ याने ५ व्या मिनिटाला वेगवान गोल करत इंग्लंडला १-० असे आघाडीवर नेले होते आणि सांचोने ही आघाडी ३-० अशी भक्कम केली.
८१ व्या मिनिटाला अँजेल गोम्स याने गोल करून चिलीच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. विशेष म्हणजे इंग्लंडने चिलीच्या गोलजाळ्यावर तब्बल २१ हल्ले
केले, त्यापैकी त्यांचे ४ हल्ले यशस्वी ठरले. दरम्यान, ७९ व्या मिनिटाला गोलरक्षक ज्युलिओ बोरकेज
याला लाल कार्डाला सामोरे जावे लागल्याने चिलीने उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळला. (वृत्तसंस्था)