स्पॅनिश धडाक्यापुढे नायजेरचा धुव्वा , ४-० विजयासह स्पेनच्या बाद फेरीच्या आशा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:23 AM2017-10-11T01:23:11+5:302017-10-11T01:23:47+5:30
पहिल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलकडून झालेल्या पराभवानंतर स्पेनने १७ वर्षांखालील फिफ विश्वचषक स्पर्धेत नवख्या नायजेरचा ४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह स्पेनने बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.
कोची : पहिल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलकडून झालेल्या पराभवानंतर स्पेनने १७ वर्षांखालील फिफ विश्वचषक स्पर्धेत नवख्या नायजेरचा ४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह स्पेनने बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.
येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अबेल रुइझ याने पहिल्याच सत्रात दोन गोल करून स्पेनचा शानदार विजय निश्चित केला. सलामीला ब्राझीलविरुद्ध १-२ असा पराभव झाल्यानंतर बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी स्पेनला मोठा विजय आवश्यक होता आणि दुबळ्या नायजेरच्या रुपाने मिळालेल्या संधीचा फायदा घेत स्पेनने धडाका केला. ‘ड’ गटात स्पेन, ब्राझील व नायजेर यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत, परंतु उत्कृष्ट गोलसरासरीच्या जोरावर स्पेनने अव्वल स्थान मिळवले आहे.
अबेलने २१ व्या आणि ४१ व्या मिनिटाला गोल करत स्पेनला भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर, ४६ व्या मिनिटाला सिझर गेलबर्ट
याने गोल करून स्पेनला मध्यंतराला ३-० असे मजबूत नियंत्रण मिळवून दिले.
दुसºया सत्रात स्पेनने आणखी आक्रमक चाली रचल्या, परंतु नायजेरने गोल करण्यापासून त्यांना रोखण्यात यश मिळवले. ८२ व्या मिनिटाला सर्जिओ गोमेझ याने अप्रतिम गोल करत स्पेनच्या ४-० अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)