केवळ संख्या वाढविण्यासाठी जात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:57 AM2018-05-30T04:57:58+5:302018-05-30T04:57:58+5:30
भारतीय उपखंडातील दिग्गज बहरीन व यूएई यांच्या आव्हानाला सामोरे जाणे सोपे नाही; पण भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाइन
नवी दिल्ली : भारतीय उपखंडातील दिग्गज बहरीन व यूएई यांच्या आव्हानाला सामोरे जाणे सोपे नाही; पण भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाइन यांनी सुनील छेत्री व त्याचा संघ पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत केवळ संख्या वाढविण्यासाठी जात नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतीय संघ यापूर्वी २०११ मध्ये आयर्लंडच्या बॉब हटन यांच्या मार्गदर्शनाखाली आशिया कप स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी भारताला आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि बहरीन यांच्याविरुद्ध सहज पराभव स्वीकारावा लागला होता, पण कॉन्स्टेन्टाइन यांच्या मते या वेळी वेगळी बाब आहे.
भारताला ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत खेळल्या जाणाºया २४ संघांच्या या स्पर्धेत थायलंड, यजमान यूएई आणि बहरीन यांच्यासह ‘अ’ गटात स्थान मिळाले आहे. सहा गटांतील अव्वल प्रत्येकी दोन संघ आणि तिसºया स्थानावरील चार सर्वोत्तम संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
भारत आपली पहिली लढत ६ जानेवारी रोजी अबूधाबीमध्ये थायलंडविरुद्ध खेळेल, तर १० जानेवारी रोजी अबूधाबीमध्ये यूएईविरुद्ध खेळणार आहे. संघाची अखेरची लढत १४ जानेवारी रोजी शारजामध्ये बहरीनसोबत होईल.
आशिया कपच्या तयारीसाठी भारत १ जूनपासून मुंबईमध्ये चार देशांचा समावेश असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. भारताव्यतिरिक्त या स्पर्धेत चीन ताईपे, केनिया आणि न्यूझीलंड हे संघ सहभागी होत आहेत.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दुसºयांदा सांभाळत असलेले ५५ वर्षीय कॉन्स्टेन्टाइन म्हणाले, ‘आम्हाला या सामन्यांची (इंटरकॉन्टिनेंटल कप) गरज आहे. आमच्याकडून चुका होतील; पण आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला चुका सुधारण्याची संधी राहील.’
भारताचा सध्याचा संघ २०११ मध्ये दोहा येथे खेळलेल्या भारतीय संघाच्या तुलनेत एकदम वेगळा आहे. भारताचा कर्णधार सुनील छेत्री २०११ मध्ये खेळणाºया संघातील एकमेव खेळाडू आहे.
छेत्री इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यान भारतातर्फे १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल, अशी आशा आहे. तो आतापर्यंत ९७ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
कॉन्स्टेन्टाइन यापूर्वी २००२ ते २००५ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, तर मार्च २०१५ मध्ये त्यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपविण्यात आली. (वृत्तसंस्था)
माझ्या मते आपल्याकडे बाद फेरी गाठण्याची चांगली संधी आहे; पण मानसिक व शारीरिकदृष्ट्या तयारी असणे आवश्यक आहे. थायलंडविरुद्ध सलामी लढत म्हणजे चुरशीचा सामना राहील. आम्ही तेथे केवळ संख्या वाढविण्याच्या उद्देशाने जात नसून विजय मिळवण्यासाठी जात आहोत.
- स्टीफन कॉन्स्टेन्टाइन
भारत मजबूत संघ व उगवत्या संघाच्या मध्ये : स्मिड
भारतातील फुटबॉल अजूनही मजबूत संघ आणि उगवत्या प्रतिस्पर्धी संघाच्या मध्ये उभा आहे, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक फ्रिट्झ स्मिड यांनी म्हटले आहे.
स्मिड हे आपल्या संघासोबत येथे आहे. हा संघ दोन जूनपासून सुरू होत असलेल्या आंतरखंडीय स्पर्धेत सहभागी होईल. त्यांनी सांगितले की, ‘मी आंतरमहाखंडीय कपमध्ये खेळण्याच्या संधीला महत्त्वाचे मानतो. कारण आमच्यासारख्या संघांना या स्पर्धेतून तीन संभाव्य दमदार प्रतिस्पर्ध्यांविरोधात खेळण्याची संधी मिळते. आणि त्या खेळाडूंना पारखण्याची संधी मिळते जे आम्हाला भविष्यात पुढे घेऊन जातील.’
भारतीय फुटबॉलबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘भारत अजूनही मजबूत संघ व प्रतिभाशाली पण उगवत्या प्रतिस्पर्धी संघाच्या मध्ये आहे. हा मोठा देश आहे व आशियाई फुटबॉल महासंघाच्या आपल्या कामाच्या दरम्यान मला वाटले की येथे व्यावसायिक लीगमध्ये चांगले काम होत आहे.’