...आता पुढचा मुक्काम कतार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:45 AM2018-07-11T04:45:12+5:302018-07-11T04:45:23+5:30
विश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत.
- रणजीत दळवी
विश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत. कतारने २००२च्या आशियाई खेळानंतर प्रथमच अरब जगतामध्ये एवढा विश्व क्रीडा उत्सव होऊ घातला आहे आणि त्याकडे करोडो क्रीडाप्रेमी उत्सुकतेने पाहात आहेत. आशियाचा विचार केला, तर जपान-कोरियाने २००२ सालीच फुटबॉलचा विश्वचषक आयोजिला होता. कतारमधील स्पर्धा ही ३२ संघांची होईल. त्यानंतरची अमेरिका-कॅनडा-मेक्सिको यांच्या यजमानपदाखालील स्पर्धेत ही संख्या दीडपट असेल.
कतारला ही स्पर्धा बहाल केल्यानंतर प्रचंड वाद झाला आणि आरोपांचे स्वरूपही गंभीर होते, शिवाय अरब जगतातील काही देशांच्या एका गटाने तर ही स्पर्धा उलथवून टाकण्याचा चंग बांधला होता. त्यामागे राजकीय हेतू होता व क्षेत्रीय आकांक्षाही होत्या. जे लाचखोरीचे आरोप झाले, ते मात्र फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांना चिकटले व त्यांना राजीनामा देण्याबरोबरच चौकशीच्या ससेमिऱ्याला तोंड द्यावे लागले.
विश्वचषकासाठी स्टेडियम व विकासकामावरील मजुरांचे अपघाती मृत्यू, त्यांचे मानवाधिकारांचे उल्लंघन यावरही वादंग उफाळला. स्पर्धा नेहमी जून-जुलैमध्ये होत असतात. कतारमध्ये आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. तेथले अतिउष्ण हवामानाचा प्रश्न स्टेडियममधील तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था असल्याने सुटला. सर्व कटकटी-अडचणी यावर मात करत कतारमध्ये स्पर्धा नियोजितपणे पार पडेल हे या घडिला स्पष्ट होते आहे. कतारमध्ये ही स्पर्धा घेण्याने आशियाई फुटबॉलला कितपत लाभ व्हावा? मुख्य म्हणजे अरब जगतामध्ये खेळाचे वेड दिसेल. शिवाय येथे बक्कळ पैसाही आहे. मात्र, खेळाचा दर्जा तसा उच्च नाही. सौदी अरेबियाच्या रशियातील प्रदर्शनाने त्याचा अंदाज आपल्याला आला. या क्षेत्रामध्ये एक गोष्ट नक्की होईल. विश्वदर्जाच्या स्टेडियम्सची निर्मिती! त्यांचा उपयोग जगातील अव्वल संघांना खेळण्यासाठी निमंत्रित करण्यास होईल. आजूबाजूंच्या देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि किफायतशीर ‘नॅशनल लीग’चे आयोजनही शक्य व्हावे. याचा जपानला किती फायदा झाला हे सर्वांनीच नाही का अनुभवले?
आशियाई संघांना अजून बरीच मजल मारायची असली, तरी कोठेतरी सुरुवात करणे गरजेचे आहे. जपान, कोरिया आणि इराणचा काही अंशी अपवाद वगळता, आशियाई संघ आफ्रिकेच्या जवळपासही येते नाहीत. आफ्रिकेने अधूनमधून आपले शक्तिप्रदर्शन केले असले, तरी लॅटिन अमेरिका आणि युरोपच्या मक्तेदारीला आव्हान देणे जमले नाही. अरब जगाचे ‘पेट्रो-डॉलर्स’ येथे फुटबॉलच्या भरभराटीला केवढा तरी मोठा हातभार लावू शकतात. ज्या प्रकारे इंग्लिश प्रीमिअर लीगमधील आर्सेनल एफसीच्या मागे आखातातील एक विमान कंपनी खंबीरपणे उभी राहिली. त्याचप्रकारे, अन्य कंपन्या आणि येथल्या राजघराण्यांच्या मालकीच्या उद्योगधद्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यावयास हवा. पैसे येतील, पायाभूत सुविधाही निर्माण होतील, हे स्पष्ट असले, तरी येथले क्रीडापटू कष्ट घेणारे नाहीत. हा कटू अनुभव आखातामध्ये हॉकी प्रशिक्षण देण्यासाठी गेलेल्या काही माजी भारतीय आॅलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आला. शिस्तीचा अभाव हीदेखील गंभीर समस्या तेथे आहे.