प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदी नेमणूक रद्द, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 02:05 AM2017-11-01T02:05:44+5:302017-11-01T02:05:53+5:30
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दणका दिला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी पटेल यांची झालेली निवड रद्द करून पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दणका दिला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी पटेल यांची झालेली निवड रद्द करून पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय क्र ीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचसोबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.
क्रीडाक्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्या. नजमी वाझिरी यांच्या खंडपीठाने प्रफुल्ल पटेल यांची निवड रद्दबातल ठरवली. (वृत्तसंस्था)
निकालाची प्रतीक्षा
क्रीडा संहितेनुसार निवडणूक घेतली नसल्याबद्दल एआयएफएफच्या अध्यक्षपदी पटेल यांची तिसºयांदा झालेली निवड रद्दबातल ठरविणाºया दिल्ली उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया फुटबॉल महासंघाने दिली. एका पत्रकाद्वारे एआयएफएफने स्वत:ची बाजू मांडली. या पत्रकात दिल्ली उच्च न्यायालयाने कुठल्या कारणास्तव हा आदेश दिला, याची माहिती नसल्याचे म्हटले. आदेशाची प्रत मिळताच कारवाईचा विचार केला जाईल. १२ मे रोजी राखीव ठेवण्यात आलेला आदेश कुठल्या आधारे पारित झाला याची एआयएफएफला माहिती नाही.