मेस्सीवर चांगल्या कामगिरीचे दडपण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:36 AM2018-06-20T03:36:46+5:302018-06-20T03:36:46+5:30
यंदाच्या विश्वचषकाचे जेतेपद पटकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लियोनेल मेस्सीला स्वप्नपूर्तीसाठी वेळ फार कमी आहे. यामुळे अर्जेंटिनाच्या या स्टारवरील दडपण सारखे वाढतेच आहे.
निजनी नोवगोरोद(रशिया): यंदाच्या विश्वचषकाचे जेतेपद पटकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लियोनेल मेस्सीला स्वप्नपूर्तीसाठी वेळ फार कमी आहे. यामुळे अर्जेंटिनाच्या या स्टारवरील दडपण सारखे वाढतेच आहे. मेस्सीने स्वत:च्या बार्सिलोना क्लबला जवळपास सर्वच स्पर्धा जिंकून दिल्या. त्यात चॅम्पियन्स लीगच्या चार जेतेपदांचाही समावेश आहे. याशिवाय ला लीगा चषक नऊ वेळा जिंकण्याची त्याने किमया साधली. अर्जेंटिनाला मात्र त्याने एकदाही विश्वचषक जिंकून दिला नाही, हे विशेष. विश्वचषकाच्या ड गटात सुरुवातीच्या सामन्यात मेस्सी फ्लॉप ठरला. फुटबॉलच्या महाकुंभात प्रवेश करणाºया नवख्या आइसलँडने अर्जेंटिनाला १-१ ने रोखले. मेस्सीला पेनल्टीदेखील गोलमध्ये बदलता आली नव्हती. या सामन्यात मेस्सीचे ३८ प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूंनी थोपवून धरले होते. अर्जेंटिनाच्या बचावफळीतील गॅब्रिएल मर्काडो म्हणाला,‘आइसलँडविरुद्धच्या निराशेनंतर संघात काय सुधारणा घडून आली हे पहायचेय. पण त्यातून सावरून पुढचा मार्ग शोधावा लागेल. क्रोएशियाविरुद्ध करा किंवा मरा, अशी स्थिती आहे.’ क्रोएशियाने पहिल्या सामन्यात नायजेरियावर २-० असा विजय साजरा करताच या गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. अर्जेंटिनाने फुटबॉलचे मोठे जेतेपद २५ वर्षांआधी १९९३ साली कोपा अमेरिका चषकाच्या रूपाने मिळविले होते. दोनवेळेचा विश्वविजेता अर्जेंटिना मागच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीकडून पराभूत झाला. याशिवाय २०१५ आणि २०१६ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेत दोन्हीवेळा चिलीकडून पराभव होताच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.मेस्सी येत्या रविवारी 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तो अखेरचा विश्वचषक खेळत असल्याचे मानले जात आहे. संघाला गुरुवारी क्रोएशियाविरुद्ध दुसºया सामन्यात खेळायचे आहे. अखेरच्या १६ संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला कुठल्याही स्थितीत हा सामना जिंकून द्यावा लागणार आहे.