पुणेकरांनी दिल्या भारतीय फुटबॉल संघाला शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:50 AM2017-10-02T01:50:22+5:302017-10-02T01:50:27+5:30
एकाच वेळी रस्त्यावर उतरून फुटबॉल खेळणारे विद्यार्थी... फुटबॉलच्या साहाय्याने आपली कला दाखविणारे खेळाडू... पारंपरिक वाद्यांचा निनाद... तलवारबाजी, दांडपट्टा या मर्दानी खेळांनी आणलेली रंगत
पुणे : एकाच वेळी रस्त्यावर उतरून फुटबॉल खेळणारे विद्यार्थी... फुटबॉलच्या साहाय्याने आपली कला दाखविणारे खेळाडू... पारंपरिक वाद्यांचा निनाद... तलवारबाजी, दांडपट्टा या मर्दानी खेळांनी आणलेली रंगत... सेल्फीसाठी चाललेली कसरत आणि करके दिखा दे गोलच्या तालावर थिरकणारी पावले, अशा उत्साहमय वातावरणात भव्य शोभायात्रेतून पुणेकरांनी भारतात होणाºया १७ वर्षांखालील मुलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र शासन क्रीडा व शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणेच्या वतीने आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना, नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहयोगाने आयोजित या फुटबॉल कार्निव्हलची सुरुवात जंगली महाराज रस्त्यावर सकाळी १०.३० वाजता खासदार अनिल शिरोळे, चंद्रकांत शिरोळे यांनी झेंडा दाखवून केली. यावेळी क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युटचे संजय चोरडिया, नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष राजेश पांडे, श्रीपाद ढेकणे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, उद्योजक अमित गायकवाड, सुनील पांडे, एमओएचे कार्यालयीन सचिव राजेंद्र घुले, कुस्ती मार्गदर्शक राजाभाऊ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध फुटबॉल जगलर कुणाल राठी जगलिंग प्रात्यक्षिके आणि शिवराय ढोल पथक, शिवाजी मर्दानी आखाडा यांच्या दमदार प्रात्याक्षिकाने सुरुवात झाली. यासह कार्निव्हलमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मुलांसह पुणे क्रीडा प्रबोधिनी आणि एफसी पुणे सिटी संघातील खेळाडूंनी फुटबॉलची प्रात्याक्षिके सादर करून कार्निवलमध्ये जल्लोष आणला. यामध्ये खेळाडूंसह, फुटबॉलचे प्रशिक्षक, शासकीय अधिकारी, यांसोबतच टॉलमॅन, मिकी माऊस हे देखील सहभागी झाले होते.
अनिल शिरोळे म्हणाले, की फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद यंदा भारताला मिळाले आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. फुटबॉल खेळण्याइतकेच देशात चैतन्यनिर्मिती होणेदेखील महत्त्वाचे आहे. पाश्चात्त्य देशांप्रमाणेच भारतातदेखील फुटबॉलला मोठी पसंती आहे. त्यामुळे भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास आहे.