हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनची विक्रमी आवक; शेडमध्ये जागा अपुरी पडल्याने माल रस्त्यावर
By रमेश वाबळे | Published: November 21, 2023 07:07 PM2023-11-21T19:07:20+5:302023-11-21T19:07:57+5:30
२१९० क्विंटलची आवक झाली,४८०० ते ५२०० रुपये मिळाला भाव
हिंगोली : तीन दिवसांच्या बंदनंतर मंगळवारपासून हिंगोलीच्या मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. या दिवशी सोयाबीनची यंदाच्या वर्षातील विक्रमी २ हजार १९० क्विंटल आवक झाली. त्यामुळे टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर टाकावा लागला. ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये भाव मिळाला.
जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा एकूण क्षेत्राच्या अर्ध्याहून अधिक होतो. तर उर्वरित क्षेत्रात हळद, कापूस, तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. यंदा समाधानकारक पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे उडीद, मुगासह सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले.
उत्पादन घटल्यामुळे सोयाबीनला किमान ६ हजारांचा तरी भाव मिळेल अशी अपेक्षा असताना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाच हजारांचा पल्लाही सोयाबीन गाठत नव्हते. परंतु, दिवाळीत आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावे लागले. दीपावलीनंतर मात्र भावात किंचित वाढ झाली असून, १६ नोव्हेंबरपासून २०० ते २५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भावात आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
हिंगोलीचा मोंढा १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान इज्तेमामुळे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी मोंढा सुरू होताच आवक मोठ्या प्रमाणात वाढली. तब्बल २ हजार १९० क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. या दिवशी शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती. मात्र, ५ हजार २०० वर भाव गेले नाहीत. तर आवक वाढल्यामुळे टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने जवळपास ३० ते ४० शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकावे लागले.
माल रस्त्यावर असल्याने नाराजी
काही व्यापाऱ्यांनीही खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या मोंढ्यातील टिनशेडमध्ये ठेवल्या आहेत. आधीच जागा अपुरी आणि त्यात व्यापाऱ्यांचा माल पडून राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल टाकण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.