रोनाल्डो व मार्टिन्स सर्वोत्तम फुटबॉलपटू, फिफाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 02:02 AM2017-10-24T02:02:04+5:302017-10-24T07:02:30+5:30
लंडन- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले.
लंडन- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले. जागतिक फुटबॉल नियंत्रण संस्था 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लंडनच्या पेलाडियम थिएटर येथे सोमवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला. त्यात जगभरातील नावाजलेल्या फुटबॉलपटूंसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आले.
रोनाल्डोने आपल्या पुरस्काराबद्दल जगभरातील आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत तर मार्टिन्स हिने आपल्या आईवडिलांना विशेष धन्यवाद दिले आहेत. प्रतिभेला मेहानतीची जोड दिली तरच यश मिळते असे ख्रिस्तियानो रोनाल्डोने या समारंभात सांगितले. त्याने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे. यासह मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्याने मोडला.
सर्वोत्कृष्ट गोल आणि सर्वोत्तम महिला खेळाडू अशा दोन पुरस्कारांसाठी नॉमिनेशन मिळालेली व्हेनेझुएलाच्या अवघ्या 18 वर्षाच्या डेना कसेलेनोस हिला एकही पुरस्कार मिळाला नाही. याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची (बेस्ट वर्ल्ड इलेव्हन) संघाची घोषणा करण्यात आली. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो व जियानलुकी ब्युफॉन या विजेत्यांसह मेस्सी व नेमार यांचाही समावेश आहे.
फिफाचा वर्ल्ड इलेव्हन संघ असा-
जियानलुकी ब्युफान (गोलकीपर), डॕनी आल्वेस, मार्सेलो , सर्जीयो रामोस, लिओनादो बानुस्ची, लुका मोड्रीक, टोनी क्रुस, आंद्रियास इनियेस्टा, लियोनेल मेस्सी, नेमार आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो
पुरस्कार विजेते...
सर्वोत्तम गोलरक्षक- जियानल्युकी ब्युफॉन
सर्वोत्तम गोल- अॉलिव्हर जिरुड
सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) - झिनेदिन झिदान(रियाल माद्रिद)
सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला)- सरिना विगमन(नेदरलँड)
सर्वोत्तम चाहते- सेल्टिक एफ सी
खेळाडूवृत्ती पुरस्कार- फ्रान्सिस कोने
सर्वोत्तम महिला खेळाडू- लुकी मार्टिन्स (नेदरलँड)
सर्वोत्तम पुरुष खेळाडू- ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)