रोनाल्डोने पूर्ण केले ‘शतक’, चॅम्पियन्स लीग स्पर्धेत नोंदवला 100 वा वैयक्तिक गोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:17 AM2018-02-16T01:17:14+5:302018-02-16T01:17:25+5:30
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिद संघाने पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्रात विजयी आगेकूच केली.
माद्रिद : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिद संघाने पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्रात विजयी आगेकूच केली. विशेष म्हणजे यासह रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत आपला शंभरावा गोल नोंदवला.
माद्रिदने सुरुवातीला सावध भूमिका घेतल्यानंतर मोक्याच्यावेळी वेगवान खेळ केली. फुटबॉलचाहत्यांचे लक्ष रोनाल्डोसह पीएसजी संघाकडून खेळणाºया स्टार नेमारच्या कामगिरीकडेही लागले होते. मात्र, रोनाल्डो मॅजिकपुढे नेमारचा जलवा प्रभावी ठरला नाही. पीएसजी संघाकडून झालेला सामन्यातील एकमेव गोल अॅड्रियन रेबियोट्स याने नोंदवला. या गोलमध्ये सूत्रधाराची भूमिका निभावताना नेमारने मोलाचे योगदान दिले. मात्र, माद्रिदचा धडाका रोखण्यात पीएसजी अपयशी ठरले.
आता हे दोन्ही संघ ६ मार्चला एकमेकांविरुद्ध परतीचा सामना खेळतील. या सामन्यात नेमारवर आपल्या संघाला विजयी करण्यासाठी मोठी जबाबदारी असेल. ‘आमच्या खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी आम्हाला याच प्रकारच्या प्रदर्शनाची आवश्यकता होती,’ अशी प्रतिक्रीया रियाल माद्रिदचा कर्णधार सर्जियो रामोस याने दिली.
2016 रियाल माद्रिदने ला लीगा आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेवर कब्जा केला होता.
2017 चे वर्ष रोनाल्डोसाठी स्वप्नवत होते. गतवर्षीच त्याने अर्जेंटिनाचा स्टार आणि दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीला मागे टाकत फीफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार उंचावला होता. ३२ वर्षीय रोनाल्डोने पाचवेळा हा पुरस्कार मिळवला आहे.