रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:19 AM2018-06-17T03:19:19+5:302018-06-17T03:19:19+5:30

अभिनयसम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डो युरोविजेते पोर्तुगाल आणि माजी जगज्जते स्पेन यांच्यातील बऱ्यापैकी रंगलेल्या लढतीमध्ये त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरला.

Ronaldo 'Hero' of 'Antihiro'? | रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’?

रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’?

Next

- रणजित दळवी
अभिनयसम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डो युरोविजेते पोर्तुगाल आणि माजी जगज्जते स्पेन यांच्यातील बऱ्यापैकी रंगलेल्या लढतीमध्ये त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरला! त्याने शानदार ‘हॅट्ट्रिक’ केली. त्याच्या कौशल्याबाबत कोणाच्याच मनात शंका नाही. तो श्रेष्ठ की मेस्सी? हा प्रश्न सदोदित विचारला जाईल व त्याचे निर्णायक उत्तर मिळणे कठीणच जावे. मात्र, रोनाल्डोच्या खिलाडू वृत्तीविषयी शंका घ्यायला बराच वाव आहे. कालचीच गोष्ट घ्या. त्याने ज्या प्रकारे जी फ्री-किक मिळविली, ती त्याच्या अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करून गेली. त्याने ज्या प्रकारे त्याचा प्रतिस्पर्धी बचावपटू पिके याने मागून ढकलल्याचे सिद्ध करताना जे नाटक केले ते अप्रतिम वठले. आपल्याला पिकेने ढकलले, हे रेफरी गिअ‍ॅनलुची रॉकी यांच्या मनावर ठसविण्यात तो यशस्वी झाला. बिचारे विश्वचषकातील आपल्या पदार्पणाच्या लढतीतच एका महत्त्वाच्या क्षणी चुकीच्या निर्णयाचे धनी झाले. एवढी मोठी लढत. त्यात ही चूक! ‘पोस्ट मॅच अ‍ॅनॅलिसीस’दरम्यान व्हिडीओ रिप्ले पाहिल्यानंतर त्यांच्या ती लक्षात आली नाही, तरी निदर्शनास आणून दिली जाईल.
त्या फ्री किकवरचा रोनाल्डोचा गोल अप्रतिम, ‘हाय-क्लास’! एकदा वाटले, की बचावात्मक भिंत चुकीच्या पद्धतीने उभारली गेली; पण नाही, रोनाल्डोने एखाद्या सराइताने गाडी वळवावी तसा चेंंडू त्याभोवती वळविला.
इंग्लिश साखळीच नव्हे, तर सध्या जगातला अव्वल गोलरक्षक असणारा डे ही चक्क जमिनीला खिळून राहिला. मोहनी घातल्यासारखा! बरे रोनाल्डोने चेंडू वळविला तेथे स्पेनचे पिके आणि बुस्केटस हे दोन्ही उंच बचावपटू उभे होते. सलाम रोनाल्डो! पण, त्या अखिलाडू कृत्यासाठी तुझा धिक्कार! नाही शोभत जगातील अव्वल खेळाडूला! पुढच्या पिढीसमोर हा आदर्श?
बाकी खेळाविषयी म्हणायचे, तर स्पेन प्रशिक्षकांच्या हकालपट्टीनंतर सावरतो आहे, ही त्याच्या चाहत्यांसाठी सुचिन्हे. डिएगो कॉस्टाचे दोन्ही गोल अप्रतिम. पहिला गोल करताना त्याच्यासमोर होते किमान चार प्रतिस्पर्धी आणि गोलरक्षक. पण त्यांना दिलेली हुलकावणी? बघत राहावी, पुन:पुन्हा. स्पेनचा दुसरा गोल हा ‘सेट-पीस’चा एक छान नमुना. इनिएस्टोने चेंडू अचूक ‘चिप’ केला. बुस्केटसचा अप्रतिम क्रॉस हेडर आणि मोक्याच्या ठिकाणी हजर डिएगो! केवढा सुनियोजितपणा?
पोर्तुगालचे अन्य दोन गोल हे ‘गिफ्ट’ होते. नाचोने रोनाल्डोला पाडले. परिणाम, पेनल्टी! रोनाल्डो थोडीच अशी संधी सोडतो? डे ही याने रोनाल्डोचा त्यानंतरचा फटका एवढ्या गलथानपणे गोलमध्ये जाऊ द्यावा? आमचा सोडा, त्याचाच विश्वास बसणार नाही. मात्र, नाचोने वीसएक यार्डांवरून ‘आऊटस्टेप’ने मारलेली व्हॉली म्हणजे स्वप्नवत! फार क्वचित असा मोका मिळतो. आधीच्या चुकीची भरपाई ही अशाने केली.
एक बरे झाले, की ही लढत अनिर्णीत राहिली. कारण, स्पर्धेत पुढे पुन्हा यांची गाठ पडणार, हे निश्चित. तेव्हाही रोनाल्डो विरुद्ध स्पेन असाच मामला असेल. मात्र, त्या वेळी
स्पेनला सूर गवसलेला असेल. डे ही हादेखील सावरलेला असेल. त्याचे तसे होणे महत्त्वाचे आहे. कारण, या मोहिमेतला तो अत्यंत महत्त्वाचा मोहरा आहे.
हा आठवडा मोरोक्कोसाठी खराब गेला. विश्वचषक आयोजनाचे स्वप्न भंगले व इराणविरुद्धच्या पराभवाने या स्पर्धेतली गच्छंतीही जवळपास निश्चित झाली. बिचारा अझीज बौहादूझ, दोन मिनिटांसाठी जखमी आम्रबातसाठी मैदानावर आला व संघावरचे संकट दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाअंती ‘खलनायक’ ठरला! ‘अ‍ॅडेड टाइम’मध्ये असणारा दबाव किती असतो, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

Web Title: Ronaldo 'Hero' of 'Antihiro'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.