रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:45 AM2019-03-16T06:45:05+5:302019-03-16T06:45:40+5:30
युरोपियन लीग फुटबॉल : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर
माद्रिद : युरोपातील सर्वांत प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी या जगातील अव्वल खेळाडूंनी आपापल्या संघाला अंतिम आठ संघात प्रवेश मिळवून देत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रोनाल्डो आणि मेस्सी समोर येतात का, याची उत्सुकता होती. मात्र, जाहीर झालेल्या ड्रॉ नंतर उपांत्यपूर्व फेरीत हे खेळाडू समोरासमोर येण्याची शक्यता मावळली आहे; परंतु अंतिम फेरीत बार्सिलोना आणि युव्हेंटस हे क्लब जेतेपदासाठी भिडण्याची शक्यता आहे.
युव्हेंटसने ०-२ अशा पिछाडीवरून अॅटलेटिको माद्रिदवर ३-२ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. परतीच्या सामन्यात रोनाल्डोने हॅट्ट्रिक साजरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. रोनाल्डोने रेयाल माद्रिदची साथ सोडल्यामुळे स्पॅनिश क्लबला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. रेयाल माद्रिदला नमवणाऱ्या अयाक्स क्लबशीच उपांत्यपूर्व फेरीत युव्हेंटसला भिडावे लागणार आहे.
अयाक्स क्लबने २००३नंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. घरच्या मैदानावर त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. १९९६ च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत हे दोन्ही क्लब भिडले होते. बार्सिलोना आणि युव्हेंटस यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत सामना होणार नसला तरी ड्रॉनुसार हे क्लब अंतिम फेरीत भिडू शकतील.