रोनाल्डोच्या निर्णयाचा मँचेस्टर युनायटेडला फायदा, कसा ते वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:27 PM2018-07-11T16:27:01+5:302018-07-11T16:27:59+5:30
युव्हेंट्स क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डोला 800 कोटींमध्ये आपल्या चमूत दाखल करून घेतले असले तरी त्याचा फायदा रोनाल्डोचे माजी क्लब मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग लिस्बन आणि नॅशनल यांनाही होणार आहे.
लंडन - ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंट्सची 800 कोटीची ऑफर स्वीकारली आणि जगभरातील त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालच्या या खेळाडूला बाद फेरीचा अडथळा पार करता आला नाही. या अपयशानंतरही युव्हेंट्सने त्याला तगडी रक्कम मोजून चार वर्षांसाठी करारबद्ध केले. रेयाल माद्रिद क्लबकडून आजच्या घडीला एखाद्या खेळाडूला दुस-या क्लबने मोजलेली ही मोठी रक्कम आहे. 34 वर्षांचा असूनही रोनाल्डोची गोल करण्याची भूक संपलेली नाही. रेयाल माद्रिदच्या या सर्वोत्तम खेळाडूने पाच बेलॉन डी ओर पुरस्कार जिंकले आहेत.
युव्हेंट्स क्लबने त्याला 800 कोटींमध्ये आपल्या चमूत दाखल करून घेतले असले तरी त्याचा फायदा रोनाल्डोचे माजी क्लब मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग लिस्बन आणि नॅशनल यांनाही होणार आहे. फिफाच्या नव्या नियमानुसार 12 ते 23 वर्षांखालील फुटबॉलपटूंच्या सराव खर्चासाठी एखाद्या खेळाडूच्या ट्रान्सफर रकमेतील 5 टक्के रक्कम माजी क्लबला मिळणार आहेत. त्यानुसार रोनाल्डोच्या ट्रान्सफर रकमेतील पाच टक्के रक्कम ही मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग आणि नॅशनल क्लबमध्ये विभागली जाणार आहे.
कोणत्या क्लबला किती रक्कम मिळणार
मँचेस्टर युनायटेड - 20 कोटी
स्पोर्टिंग लिस्बन - 17 कोटी
नॅशनल - 1 कोटी
2003मध्ये रोनाल्डोने स्पोर्टिंग क्लबमधून मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये उडी घेतली. इंग्लिंश प्रीमिअर लीगमध्ये त्याने 196 सामने खेळले. त्यानंतर 2009 मध्ये त्याने रेयाल माद्रिद क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला.