रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:51 AM2021-06-17T05:51:16+5:302021-06-17T05:51:40+5:30

युरो चषक फुटबॉल रोनाल्डोची जादू दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यास मिळाली. त्याने ८७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर इन्ज्युरी टाइमध्ये दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला.

Ronaldo's record-breaking performance; Portugal beat Hungary 3-0 | रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का

रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का

Next

बुडापेस्ट : स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपला जलवा दाखवताना हंगेरीच्या आव्हानातील हवा काढली. त्याने केलेल्या 
दोन शानदार गोलच्या जोरावर गतविजेत्या पोर्तुगालने विजयी सलामी देताना हंगेरीचा ३-० असा धुव्वा उडवला. या शानदार कामगिरीसह रोनाल्डो युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.

रोनाल्डोची जादू दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यास मिळाली. त्याने ८७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर इन्ज्युरी टाइमध्ये दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला. त्याआधी ८४ व्या मिनिटालाच बचावपटू राफेल गुरेइरो याने गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली होती. केवळ पाच मिनिटांमध्ये तीन गोलचा धडाका करत पोर्तुगालने दिमाखदार विजय मिळवला.

२००४ साली पहिल्यांदा युरो चषक स्पर्धेत खेळलेला रोनाल्डो विक्रमी पाचव्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या सामन्याआधी दिग्गज फुटबॉलपटू मायकल प्लॅटिनी यांच्या स्पर्धेतील सर्वाधिक नऊ गोलची त्याने बरोबरी केली होती. मात्र, हंगेरीविरुद्ध दोन गोल करत रोनाल्डोने आपल्या गोलची संधी ११ अशी करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, सलग पाच युरो चषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.

स्वयंगोल आणि जर्मनी पराभूत
n म्युनिख : युरो चषक स्पर्धेत जर्मनीला बलाढ्य फ्रान्सकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणाऱ्या मॅट्स हमेल्स याच्याकडून झालेली चूक जर्मनीच्या पराभवास कारणीभूत ठरली. हमेल्सकडून झालेला स्वयंगोल सामन्यातील एकमेव गोल ठरला आणि या जोरावर फ्रान्सने १-० अशी बाजी मारली.
n अनुभवी बचावपटू हमेल्सला प्रशिक्षक जोकिम लूव यांनी अंतिम संघात स्थान दिले, मात्र त्याचे पुनरागमन सुखद ठरले नाही. २० व्या मिनिटाला लुकास हर्नांडेजने केलेल्या क्रॉसवर चेंडू फॉरवर्ड काएलिन एमबाप्पे याच्याकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न हमेल्सने केला. मात्र या प्रयत्नात चुकून चेंडू जर्मनीच्याच गोलजाळ्यात गेल्याने फ्रान्सला आयतीच आघाडी मिळाली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत फ्रान्सने बाजी मारली.
n सामन्यानंतर प्रशिक्षक लूव म्हणाले की, ‘पराभवासाठी मी हमेल्सला दोष देणार नाही. आमचे नशीब खराब होते. चेंडू वेगात होता आणि त्याला बाहेर करणे कठीण होते.’ दोन्ही संघांनी खास करून फ्रान्सने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. यापैकी फ्रान्सचे दोन गोल ऑफसाइड निर्णय दिल्याने अवैध ठरले.

Web Title: Ronaldo's record-breaking performance; Portugal beat Hungary 3-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.