आईशप्पथ! सचिन तेंडुलकरचा इंग्लंडला 'फुल सपोर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:28 PM2018-07-11T12:28:26+5:302018-07-11T12:36:23+5:30
इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी सचिनचं ट्विट
मुंबई: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर इंग्लंडला पाठिंबा देत असेल, तर तुम्हाला कसं वाटेल? सचिननं एक ट्विट करुन आपला पाठिंबा इंग्लंडला असल्याचं जाहीर केलं आहे. भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू होत असताना सचिन इंग्लंडला कसा काय पाठिंबा देऊ शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र सचिनचं ट्विट हे क्रिकेटबद्दल नाही, तर फुटबॉलबद्दल आहे.
फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना आज होणार आहे. या सामन्यात इंग्लंडसमोर क्रोएशियाचं आव्हान असेल. या सामन्याआधी सचिननं एक व्हिडीओ ट्विट केला आहे. आपण इंग्लंडला पाठिंबा देत असल्याचं यामध्ये सचिननं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं इंग्लंडचा माजी गोलरक्षक डेव्हिड जेम्सला टॅग केलं आहे. या व्हिडिओत सुरुवातीला सचिनच्या हातात क्रिकेटचा बॉल दिसतो. 'यावेळी मी इंग्लंडला पाठिंबा देत आहे,' असं सचिननं व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे. त्यानंतर सचिननं एक छोटा पॉज घेत फुटबॉलला किक मारत 'फुटबॉलमध्ये' असं म्हणत वाक्य पूर्ण केलं. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात सचिन इंग्लंडच्या बाजूनं असेल.
Come on England!! #FIFA18@JamosFoundationpic.twitter.com/S9PZ9EWQHk
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 11, 2018
इंग्लंडच्या संघाला 1990 पासून फिफा विश्वचषक पटकावता आलेला नाही. त्यामुळे हॅरी केन आणि कंपनीसमोर विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी चांगला खेळ करण्याचं मोठं दडपण असेल. स्वीडनचा 2-0 नं पराभव करत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. क्रोएशियानं बलाढ्य अर्जेंटिनाला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. इंग्लंडनं आजचा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होईल. फ्रान्सनं बेल्जियमला धूळ चारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.