रशियात सुरक्षिततेची चोख व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:23 AM2018-06-14T05:23:19+5:302018-06-14T05:23:19+5:30
रशियासाठी यंदाचा विश्वचषक कठोर परीक्षेची वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात आणि एकूणच विश्वभरात ‘सुपर पॉवर’ गणल्या गेलेल्या रशियाची लढाई आहे ती दोन आघाड्यांवर.
- रणजीत दळवी
रशियासाठी यंदाचा विश्वचषक कठोर परीक्षेची वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात आणि एकूणच विश्वभरात ‘सुपर पॉवर’ गणल्या गेलेल्या रशियाची लढाई आहे ती दोन आघाड्यांवर. त्यापैकी आयोजनात, म्हणजे अर्थबळ मूलभूत सुविधा यात कोणत्या प्रकारच्या त्रुटी आढळणार नाहीत याचे कारण हा देश प्रगत आहे. त्यांची खरी लढाई ती ‘हुल्लडबाजी’ किंवा इंग्रजीत सांगायचे झाल्यास ‘हुलिगनिझम्’शी. त्यावर कडक उपाययोजना करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण २०१६ साली फ्रान्समध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती झाली, तर त्यांची प्रतिष्ठा पार धुळीला मिळेल. त्यांच्या चाहत्यांनी फ्रान्सच्या मॉर्से शहरामध्ये इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर जो नंगानाच घातला, तेव्हापासून रशियन पाठीराखे केव्हाही काहीही करतील अशा भीतीची तलवार सतत डोक्यावर लोंबकळते आहे. चुकून जरी काही अघटित घडले तर? म्हणून मॉस्कोमध्ये अभूतपूर्व असा हरतºहेचा बंदोबस्त आहे. त्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज आहे. साधारणपणे तीस हजारच्या आसपास पोलीस तैणात आहेत. अगदी श्वानपथकांपासून ते आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या दिमतीला आहे.
हुल्लडबाजी, दंगली, देशा-देशांमधील पाठीराख्यांमधील राडे यामुळे फुटबॉल बऱ्यापैकी बदनाम आहे. आपल्या संघाचा पराभव गळी उतरवणे चाहत्यांना कठीण जाते. एक तर अतिमद्यपान केलेल्या अवस्थेत हे लोक खेळ पाहण्यास येतात व त्यानंतर आपापसांत घडते ती तुंबळ लढाई. स्टेडियमच्या बाहेरही चकमकी घडतात आणि हे सर्व होऊ न देणे आयोजकांची जबाबदारी आणि डोकेदुखी असल्याने त्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
मॉस्कोसारख्या विस्तीर्ण महानगरामध्ये प्रगतीचे प्रतीक म्हणजे त्यांची वाहतूक व्यवस्था. त्यांच्या मेट्रोचे जाळे तर चक्रावून टाकणारे आहे. सोबत उत्तम बसची व्यवस्था. ट्राम, लोकल रेल्वे, केवढा तरी व्याप आहे; आणि त्यावर नजर ठेवणे जिकिरीचे काम आहे. सध्या विदेशी चाहत्यांची येथे म्हणावी तेवढी वर्दळ नाही. कदाचित बंदोबस्त चोख असल्याची जाणीव त्यांना झाली असावी. पण त्यांचा वावर येत्या दोन दिवसांत वाढेल. त्यांच्यासाठी जागोजागी माहिती केंद्र उभारण्यात आली आहेत. ‘मॉस्को ट्रान्सपोर्ट’ अशी अधिकृत पुस्तिकाही काढण्यात आली आहेत. त्यामध्ये सायकल ते टॅक्सी शेअरिंग कसे करावे याची माहिती आहे. स्टेशन ते स्टेडियम अशी सायकल सुविधा उपलब्ध आहे. ‘अॅप्स’मुळे सारे काही सोयीचे झाले आहे. या सायकल फोल्डिंगच्या आहेत व त्या मेट्रो, बस, ट्रॉलीबस आणि ट्रॅममधून विनामूल्य नेण्याची मुभा आहे. हे लक्षात घेता किती बारकाईने आयोजन केले गेले असावे याचा अंदाज येतो. त्यासाठी ‘सायकल लेन्स’ आखण्यात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी वेगळी सिग्नल व्यवस्थाही आहे.
जाहिरात म्हणाल, तर ती जवळजवळ नाहीच. पोस्टर, बॅनर, होर्डिंग यांचा ओंगळपणा कोठेच नाही. मेट्रो स्टेशन, बस स्थानके येथेच काय ते लहान - सहान फलक, तेही दिशा निर्देशनाचे. फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे ‘ग्रेटेस्ट शो आॅन अर्थ’ असे मानले जाते. तेव्हा जगातील सर्वांत मोठ्या उत्सवाला आहे का गरज जाहिरातबाजीची?