कुंडली पाहून भारतीय फुटबॉल संघाची निवड! कोच स्टिमक यांनी ज्योतिषाला दिले १२ ते १५ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 06:17 AM2023-09-13T06:17:40+5:302023-09-13T06:17:59+5:30
Indian football Team: भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी गेल्या वर्षी अनेक सामन्यांमध्ये संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी ज्योतिषी भूपेश शर्मा यांची मदत घेतली होती.
नवी दिल्ली - भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी गेल्या वर्षी अनेक सामन्यांमध्ये संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी ज्योतिषी भूपेश शर्मा यांची मदत घेतली होती. एवढेच नाही तर ग्रह-तारे योग्य स्थितीत असल्यास ज्योतिषाने खेळाडूंना भारतीयफुटबॉल संघात खेळण्याची संधी दिली. त्यापोटी त्याला १२ ते १५ लाख रुपये मानधन देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
वृत्तानुसार, गेल्या वर्षी मे- जूनमध्ये आशियाई कप क्वालिफायरमध्ये अफगाणिस्तान, कंबोडिया, हॉंगकॉंग आणि जॉर्डन या चार देशांविरुद्ध सामन्याच्या ४८ तास आधी प्रशिक्षक स्टिमक यांनी ११ खेळाडूंच्या नावांची यादी ज्योतिषी भूपेश शर्मा यांनाही पाठवली होती. या दोन महिन्यांच्या काळात स्टिमक आणि शर्मा यांच्यात १०० मेसेजेसची देवाणघेवाण झाली. खेळाडूंना त्यांच्या कुंडलीची स्थिती जाणून घेतल्यावरच भारतीय फुटबॉल संघात खेळण्याची संधी मिळत असे. प्रत्येक सामन्याआधी स्टिमक यांनी संघाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी ज्योतिषाकडून माहिती घेतली होती आणि जखमी तसेच पर्यायी खेळाडूंबाबतची रणनीतीही शेअर केली होती.
खरे तर संघात सामील होण्यासाठी तंदुरुस्तीसोबतच खेळाडूंचे ग्रह योग्य असायला हवेत. पण ज्यांचे स्टार्स चांगले नाहीत त्यांना संघात संधी मिळणार नाही, हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. ज्योतिषाने काही खेळाडूंच्या नावांविरोधातही भाष्य केल्याची माहिती आहे. कोण चांगली कामगिरी करेल आणि कोण नाही? याशिवाय संघात कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश करावा हे ओळखण्यासाठी ‘रेड सिग्नल’चा वापर करण्यात आला.
होय, ज्योतिषाची मदत घेतली!
एआयएफएफचे तत्कालीन सरचिटणीस कुशल दास यांनी प्रशिक्षक स्टिमक आणि ज्योतिषी भूपेश यांच्यात भेटीची व्यवस्था केली होती. दास म्हणाले, ‘आम्ही संघातील खेळाडूंच्या निवडीसाठी ज्योतिषी भूपेश शर्मा यांची दोन महिने मदत घेतली. याशिवाय सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे पेमेंटही करण्यात आले.’