‘भारतीय फुटबॉल’चा दणदणीत विजय; छेत्रीचे पुन्हा वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:40 PM2018-06-04T23:40:41+5:302018-06-04T23:40:41+5:30
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली.
मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी भारतीय संघाने चाहत्यांच्या अपेक्षाही पूर्ण करताना केनियाचा ३-० असा धुव्वा उडवला.
अंधेरी येथील ‘मुंबई फुटबॉल अरेना’ स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यापूर्वी छेत्रीने प्रेक्षकांना फुटबॉल सामन्याकडे वळविण्यासाठी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये त्याने, ‘तुम्ही आम्हाला एकवेळ शिव्या घाला, आमच्यावर टीका करा, पण आमचा खेळ पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थित रहा.’ असे आवाहन केले होते. सुनीलच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि सामन्याची सर्व तिकिटेही विकली गेली.
त्याचबरोबर केनियाविरुद्धचा सामना सुनीलच्या कारकिर्दीतील शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना होता. विशेष म्हणजे भारताकडून शंभर सामने खेळण्याचा मान मिळवणारा तो केवळ दुसराच फुटबॉलपटू ठरला. याआधी केवळ बायचुंग भुतिया यानेच शंभरहून अधिक सामने खेळले आहेत. भुतियाने १०४ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या सामन्यासाठी भुतियासह आय. एम. विजयन हे भारतीय दिग्गज खेळाडूही उपस्थित होते आणि त्यांनी सुनीलचा सन्मानही केला. तसेच, यावेळी संघातील सहकारी आणि सुनीलची पत्नी यांनी मैदानावर त्याला ‘गार्ड आॅफ आॅर्नर’ही दिला.
केनियाचा उडाला धुव्वा...
आपल्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल नोंदवत कर्णधार सुनील छेत्रीने केनियाविरुद्ध भारताचा ३-० असा दणदणीत विजय नोंदवला. यासह यजमान भारताने इंटरकॉन्टीनेंटल चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. सुनीलशिवाय जेजे लालपेखलुआ याने गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले.
सुनील छेत्रीने चाहत्यांना केलेले आवाहन लक्षवेधी आणि धक्कादायक ठरले. एक कर्णधार जेव्हा आपल्या संघाचा सामना पाहण्यास येण्याचे आवाहन करतो, तेव्हा नक्कीचे ते अनपेक्षित ठरते. शिवाय ४ जूनचा सामना सुनीलचा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना होता. फुटबॉल जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. पूर्वी भारतात तीन खेळ एकाच बरोबरीने होते ते म्हणजे हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेट. पण आज क्रिकेट जबरदस्त उंचीवर असून त्यातुलनेत इतर खेळ खूप मागे आहेत. त्यामुळे सुनीलने एक मोठी विनंती केली आहे आणि याला पाठिंबाही दिला पाहिजे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनीही सुनीलच्या विनंतीला पाठिंबा देत भारतीयांना आवाहन केले. खेळाडू हे एका कलाकार प्रमाणे असतात आणि कलाकारापुढे प्रेक्षकच नसतील, तर कसे वाटेल? अशीच स्थिती सुनीलसाठी आहे. त्यामुळे जर का भारतात क्रीडा संस्कृती तयार करायची असेल, तर प्रत्येक खेळाला पाठिंबा दिला गेला पाहिजे.
- अयाझ मेमन, लोकमत संपादकीय सल्लागार
मी व्हिडिओद्वारे केलेल्या आवाहनाचा इतका मोठा परिणाम होईल याची अपेक्षाही केली नव्हती. जेव्हा तुम्ही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत असता, तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीची अपेक्षा असते.’ - सुनील छेत्री