स्पेन, स्वीडनची गोलशून्य बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:39 AM2021-06-16T05:39:45+5:302021-06-16T05:39:52+5:30

युरो कप फुटबॉल; स्लोवाकियाचा पोलंडला धक्का 

Spain, Sweden goalless draw | स्पेन, स्वीडनची गोलशून्य बरोबरी

स्पेन, स्वीडनची गोलशून्य बरोबरी

Next

सेविले : युरो कप फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि स्वीडन या तुल्यबळ संघांमध्ये झालेल्या लढतीत गोलशून्य बरोबरी झाली. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, मात्र कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. यामुळे अखेर हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसरीकडे, स्लोवाकियाने शानदार विजय मिळवताना पोलंडला २-१ असा धक्का दिला.

चेंडूवर अधिक नियंत्रण राखत स्पेनने सामन्यावर वर्चस्व राखले. यामुळे स्वीडनवर काहीसा दबाव बनवण्यात त्यांना यश आले. मात्र, स्वीडनच्या बचावफळीने शानदार कामगिरी करत स्पॅनिश आक्रमण रोखले. त्याच वेळी, स्वीडनलाही स्पॅनिश बचाव भेदण्यात यश आले नाही. 
स्पेनने चेंडूवर ७५ टक्के नियंत्रण राखताना गोल करण्याचे १७ प्रयत्न केले. यापैकी त्यांनी पाच वेळा गोलजाळ्यावर आक्रमण केले. मात्र त्यांना यश आले नाही. स्वीडननेही स्पेनच्या गोलजाळ्यावर चार वेळा आक्रमण केले, पण एकही आक्रमण यशस्वी ठरले नाही.

स्पेन संघ युरो चषक स्पर्धेतील गेल्या १४ साखळी सामन्यांत केवळ एकदाच गोल करण्यात अपयशी ठरला आहे. त्याचवेळी, स्वीडनने 
गेल्या १७ आंतरराष्ट्रीय लढतींमध्येही एकही सामना अनिर्णीत 
राखला नव्हता.

स्लोवाकियाचा शानदार विजय
सेंट पीटर्सबर्ग : आक्रमण आणि बचावाचे शानदार ताळमेळ साधलेल्या स्लोवाकियाने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोलंडला २-१ नमवले. बचावपटू मिलान क्रिनियार याने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने रॉबर्ट लेवांडोवस्की याला गोल करण्याापासून रोखल्यानंतर निर्णायक गोल करत स्लोवाकियाला विजयी केले. १८व्याच मिनिटालाच वोजसिएच स्केझेन्सी याच्याकडून स्वयंगोल झाल्याने स्लोवाकियाला आघाडी मिळाली. ६२व्या मिनिटाला पोलंडकडून क्रीशोवियाक याने गोल करत सामना बरोबरीत 
आणला. मात्र, मिलानने ६९व्या मिनिटाला शानदार गोल करत स्लोवाकियाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवत स्लोवाकियाने दमदार बाजी मारली.

Web Title: Spain, Sweden goalless draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.