स्पेन,स्वीडन उपांत्य फेरीत, महिला विश्वचषक फुटबाॅल : नेदरलँड, जपानला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:48 AM2023-08-12T05:48:50+5:302023-08-12T05:49:03+5:30
युरोपातील दोन बलाढ्य संघांमधील सामन्यात पॅरालुएलोने १११ व्या मिनिटाला विजयी गोल केला.
वेलिंग्टन/ऑकलंड : सलमा पॅरालुएलो हिने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील स्पेनने गत उपविजेत्या नेदरलँडला २-१ असे नमवत महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, स्वीडनने जपानचे आव्हान २-१ असे परतावले.
युरोपातील दोन बलाढ्य संघांमधील सामन्यात पॅरालुएलोने १११ व्या मिनिटाला विजयी गोल केला. नेदरलँड्सचा चार वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अंतिम लढतीत अमेरिकेविरुद्ध पराभव झाला होता.
मारियोना कालडेंटीने ८१ व्या मिनिटाला गोल करत स्पेनला १-० असे आघाडीवर नेले. अखेरच्या दहा मिनिटांत नेदरलँडची बचावपटू स्टेफानी वान डर ग्राग्टने संघाला बरोबरी साधून दिली. तिच्या हाताला चेंडू लागल्याने स्पेनला ८१ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली होती. त्यावर मारियोनाने गोल केला. त्यानंतर पॅरालुएलोने विजयी गोल केला.
अलमांडा इलेस्टेडने ३२व्या मिनिटाला गोल करत स्वीडनला आघाडीवर नेले. यानंतर फिलिपा एंजेल्डालने ५१व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल करत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. जपानकडून होनाका हयाशीने ८७व्या मिनिटाला गोल केला.