Shocking : २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा Corona Virusमुळे मृत्यू, क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 11:19 AM2020-03-17T11:19:45+5:302020-03-17T11:20:29+5:30
कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले.
कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत तो २०१६ पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याच्या शरिरात कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना व्हायरस परसल्यानंतर स्पेनमध्ये आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत पावलेला गार्सिया हा मलागा येथील पाचवा व्यक्ती आहे. पण, कोरोनामुळे मृत पावलेल्यांमध्ये गार्सिया हा सर्वात युवा होता. अन्य लोकं ७० ते ८० वर्षांचे होते. कोरोना व्हायरसशी झगडण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती कमी पडली अन्यथा गार्सिया वाचला असता, असे येथील स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे स्पेनमधील सर्व फुटबॉललीग रद्द करण्यात आलेल्या आहेत. गार्सियाच्या मृत्यूपूर्वी कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींत सर्वात युवा बळी हा लंडनमधील ५९ वर्षीय निक मॅथ्यूज यांचा होता. लंडनमधील कोरोनामुळे मृतांची संख्या ही ३५ झाली आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये ८७४४ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे स्पेनमधील नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. इटली पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि फ्रान्सनेही पब्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह आणि दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गार्सियाच्या निधनावर क्लबचे अध्यक्ष पेपे ब्युएनो म्हणाले,''फ्रान्सिस्को हा प्रतिभावान प्रशिक्षक होता. आमच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता मला हॉस्पिटलमधूल सांगण्यात आले की फ्रान्सिस्कोची प्रकृती सुधारत आहे, पण तासाभरात त्याच्या जाण्याची बातमी कळली.''