क्रोएशियाचा जबरदस्त धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:22 AM2018-07-13T05:22:19+5:302018-07-13T05:22:33+5:30
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले.
- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. क्रोएशियाने यासह ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. फ्रान्सने याआधी १९९८ साली जेतेपद पटकावले होते.
इंग्लंडने १९६६ मध्ये बाजी मारली होती. त्यामुळेच इंग्लंडकडून फार आशा होत्या. खासकरून स्ट्रायकर हॅरी केन, रहीम स्टर्लिंग यांसारख्या खेळाडूंकडून खूप अपेक्षा होत्या. पण क्रोएशियाने खूपच जबरदस्त खेळ केला. अनेक टीकाकारांनी विशेषकरून ब्रिटिश टीकाकारांनी इंग्लंड खेळाडूंची शारीरिक क्षमता क्रोएशियाच्या तुलनेत अधिक असल्याचे म्हटले होते. तसेच इंग्लंड क्रोएशियन्सला खूप पळवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. पण असे झाले नाही.
क्रोएशियाने सनसनाटी आगेकूच केली असल्याने आता एक ऐतिहासिक अंतिम सामना होईल. पण एकूणच ज्याप्रकारे संभाव्य विजेत्या संघाचे आव्हान संपुष्टात येत, नव्या संघांनी मुसंडी मारली आहे, हे पाहता जागतिक फुटबॉल किती वेगाने प्रगती करत आहे, हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत दिसून आले आहे.
पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सने बेल्जियमला १-० ने नमविले. फ्रान्सने अप्रतिम तांत्रिक खेळ करताना बाजी मारली. बेल्जियमचे खेळाडू सामन्यानंतर अत्यंत निराश झाले. ‘फ्रान्सने अत्यंत बचावात्मक खेळ केला आणि हे खेळासाठी योग्य नाही,’ अशी प्रतिक्रिया बेल्जियमच्या खेळाडूंनी दिली. पण ही प्रतिक्रिया पटण्यासारखी नाही. माझ्या मते फ्रान्सने उत्कृष्ट तांत्रिक खेळ केला. त्यांची फॉरवर्ड लाइन अत्यंत मजबूत आहे. एमबाप्पे अत्यंत प्रतिभावान असा खेळाडू त्यांच्याकडे आहे. फ्रान्सचे पास देण्याचे कौशल्यही बघण्यासारखे होते. पण पासेस करणे म्हणजेच सर्व काही नसते. जेव्हा गोल करण्यात यश येते तेव्हाच सर्व गोष्टींना अर्थ असतो. फ्रान्सने सामन्यातील एकमेव व निर्णायक गोल करण्यात यश मिळवले आणि दिमाखात आगेकूच केली. क्रमवारीचा विचार केल्यास फ्रान्स बेल्जियमच्या तुलनेत खाली होता. पण त्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरतो आणि फ्रान्सने त्या
दिवशी उत्कृष्ट खेळ करताना विजय मिळवला.
आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या योजनांमध्ये काही बदल होणार का हे पाहावे लागेल. त्यांच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत, जे आघाडीवर आणि मध्यावर खेळू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे पर्यायाची कमी अजिबात नाही. यामुळेच खेळ जसा जसा पुढे जाईल तसे त्यांच्या योजना बदलत जातील. माझ्या मते फ्रान्सकडे कल्पक आक्रमक आहेत, पण क्रोएशियाकडेही त्यांना टक्कर देणारे आक्रमक आहेत. रशिया आणि इंग्लंडविरुद्ध क्रोएशियाने आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. जर त्यांनी बाजी मारली, तर नक्कीच क्रोएशिया इतिहास रचेल आणि त्यासाठीच ते फ्रान्सला सहजासहजी जिंकू देणार नाहीत हे नक्की. जर ते जिंकले तर क्रोएशियामध्ये काय बदल घडेल, त्याचा केवळ अंदाजच लावू शकतो.
क्रोएशिया जिंकल्यास अनेक लहान देशांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावेल. त्यांनाही विश्वचषक जिंकण्याची मोठी प्रेरणा मिळेल. ही झाली पुढची गोष्ट, पण आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते रविवारच्या ‘ग्रँड फायनल’कडे! हा अंतिम सामना नक्कीच एक उच्च दर्जाचा सामना होईल.