Sunil Chhetri : सुनील छेत्री आशियाई स्पर्धेत खेळणार, २३ वर्षांखालील संघात एकमेव वरिष्ठ खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:55 AM2023-09-15T05:55:47+5:302023-09-15T05:56:09+5:30
Asian Games: चीनमध्ये या महिन्यात रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून केवळ सुनील छेत्रीची निवड झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) १८ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली.
नवी दिल्ली : चीनमध्ये या महिन्यात रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून केवळ सुनील छेत्रीची निवड झाली आहे. अखिल भारतीयफुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) १८ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत फुटबॉल सामन्यांत केवळ २३ वर्षांखालील खेळाडूंना खेळता येणार आहे. मात्र, सर्व संघांना अंतिम संघात केवळ तीन वरिष्ठ खेळाडूंना खेळविण्याचीही मुभा देण्यात आली आहे. परंतु, एआयएफएफने यावेळी वरिष्ठ खेळाडूंपैकी केवळ छेत्रीची निवड केली आहे. याआधी १ ऑगस्टला जाहीर झालेल्या २२ सदस्यीय संघात छेत्रीसह संदेश झिंगन आणि गुरप्रीतसिंग संधू यांचाही समावेश होता. परंतु, आता केवळ छेत्रीला संघात स्थान देण्यात आले आहे.
अ गटात समावेश
भारतीय संघाचा अ गटात समावेश असून स्पर्धेत एकूण २३ फुटबॉल संघ पदकासाठी खेळतील. अ, ब, क, ड, ई, फ असे सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात चार संघ असून केवळ ड गटात तीन संघांचा समावेश आहे. भारताला अ गटामध्ये यजमान चीन, बांगलादेश आणि म्यानमार यांचा सामना करायचा आहे.
१९७० पासून पदकाची प्रतीक्षा
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत १९५१ आणि १९६२ साली सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर १९७० साली कांस्यपदक जिंकले. मात्र, यानंतर भारतीय संघाला या स्पर्धेत एकही पदक जिंकता आलेले नाही.
यंदा मोठी आशा
भारतीय संघाने प्रशिक्षक इगोर स्टिमक यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सॅफ अजिंक्यपद स्पर्धा जिंकतानाच फिफा क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल १०० स्थानांमध्येही प्रवेश केला. यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाकडून पदक जिंकण्याच्या मोठ्या आशा आहेत.
विशेष परवानगी
सुरुवातीला केंद्र सरकारकडून भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती. आशियातील अव्वल आठ संघांनाच या स्पर्धेत खेळण्याची अट केंद्र सरकारने ठेवली होती. मात्र, नंतर भारताच्या दोन्ही संघांना विशेष परवानगी देण्यात आली. याआधी २०१४ साली भारतीय फुटबॉल संघाने अखेरची आशियाई स्पर्धा खेळली होती.
भारतीय पुरुष फुटबॉल संघ
गुरमित सिंग, धीरज सिंग, सुमित राठी, नरेंद्र गहलोत, अमरजित सिंग कियाम, सॅम्युअल्स जेम्स, राहुल केपी, अब्दुल रबीह, आयुष देव छेत्री, ब्रायस मिरांडा, अजफर नूरानी, रहीम अली, विन्सी बरेटो, सुनील छेत्री, रोहित दानू, गुरकीरत सिंग आणि अनिकेत जाधव.