फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांनी खुर्ची सोडावी! बायचुंग भुतियाने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:52 AM2024-01-31T05:52:31+5:302024-01-31T05:52:47+5:30
Indian Football Federation: भारतीय फुटबॉल महासंघातील (एआयएफएफ) मनमानी कारभारासाठी एकटे महासचिव नव्हे तर अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष दोषी आहेत. कार्यकारिणीला विश्वासात न घेता जो कारभार करण्यात आला, त्याची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष कल्याण चौबे यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी भारतीय कर्णधार बायचुंग भुतिया याने मंगळवारी केली.
नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल महासंघातील (एआयएफएफ) मनमानी कारभारासाठी एकटे महासचिव नव्हे तर अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष दोषी आहेत. कार्यकारिणीला विश्वासात न घेता जो कारभार करण्यात आला, त्याची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष कल्याण चौबे यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी भारतीय कर्णधार बायचुंग भुतिया याने मंगळवारी केली.
एआयएफएफ कार्यकारिणी बैठकीत ही मागणी करताना भुतिया म्हणाला, ‘ज्या कारणांमुळे महासचिव शाजी प्रभाकरन यांना ७ नोव्हेंबरला निलंबित करण्यात आले, त्या प्रकरणात अध्यक्ष चौबे आणि कोषाध्यक्ष किपा अजय दोषी ठरतात. प्रभाकरन यांना आजही सुरुवातीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. ते नंतर बैठकीला ऑनलाइन उपस्थित झाले. केवळ प्रभाकरन यांना बळीचा बकरा बनविण्यात येऊ नये. फुटबॉल महासंघात राजकारणाचा शिरकाव झाला. पद सांभाळल्यानंतर वर्षभरात संघटनेत फूट पाडण्याचे कारस्थान सुरू झाले. हांगझाऊ आशियाड आणि त्यानंतर आशियाई चषकात राष्ट्रीय संघाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नव्हता.’ हांगझाऊला पोहोचल्यानंतर काही तासांत भारतीय संघ पहिला सामना खेळला होता. अधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे हे घडल्याचा आरोप करीत महासंघाच्या कामकाजात पारदर्शीपणा आणण्यासाठी एआयएफएफच्या आमसभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी सूचनादेखील भुतियाने केली.
शाजी प्रभाकरन यांना अध्यक्ष चौबे यांनी ७ नोव्हेंबरला महासचिव पदावरून हटविले होते. ८ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या निलंबनास स्थगिती दिली. महासंघाच्या घटनेनुसार केवळ कार्यकारी समितीला निलंबनाचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.