टू मच क्रिकेट इन इंडिया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:40 AM2018-06-16T05:40:45+5:302018-06-16T05:40:45+5:30
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केमलिनच्या रेड स्क्वेअरमध्ये एका दिमाखदार सोहळ्यामध्ये केलेले विश्वचषक २०१८चे उद्घाटन आणि त्यांच्या संघाने तितकाच शानदार विजय मिळविल्याने रशियामध्ये आनंदाची - चैतन्याची लाट पसरणे स्वाभाविक आहे. कोणत्याही युद्धात पहिली चकमक जिंकणे महत्त्वाचे!
- रणजीत दळवी
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केमलिनच्या रेड स्क्वेअरमध्ये एका दिमाखदार सोहळ्यामध्ये केलेले विश्वचषक २०१८चे उद्घाटन आणि त्यांच्या संघाने तितकाच शानदार विजय मिळविल्याने रशियामध्ये आनंदाची - चैतन्याची लाट पसरणे स्वाभाविक आहे. कोणत्याही युद्धात पहिली चकमक जिंकणे महत्त्वाचे! सौदी अरेबियाने सपशेल शरणागती पत्करली, म्हणून रशियाचा विजय कमी लेखता येणार नाही. तसा तो त्यांच्या घोडदौडीची नांदी असेही म्हणता येणार नाही. कारण आता त्यांना पुढची फेरी गाठण्यासाठी उरुग्वे आणि इजिप्तशी संघर्ष करावाच लागणार आहे.
दोन वर्षे आंतरराष्ट्रीय फूटबॉलपासून दूर आणि तीन वर्षांतला हा पहिलाच विजय रशियाचा आत्मविश्वास वाढविणार हे नक्की. आपली ताकद किती याचा पूर्णपणे नसला, तरी काहीसा अंदाज प्रशिक्षक स्टॅनिसलास चेसचेसोव यांना आला. बदली खेळाडू चेरयीशेव आणि झ्युबा यांनी केलेले गोल त्यांना दिलासा देऊन गेले असतील. आपल्या फौजफाट्यातले सर्व शिलेदार सज्ज पाहून, त्यांना पुढच्या चकमकींमध्ये कसे आणि कोठे लढवायचे, याचाही पक्का अंदाज आला असणार.
पहिली चकमक म्हणजे डोकेदुखी, प्रचंड दबाव. संभाव्य विजेते स्पेनसाठी, तर गेले दोन-चार दिवस प्रचंड ताणतणावाचे गेले. प्रशिक्षक हुलेन लोपेतेगुई यांची हकालपट्टी त्यांच्या संघाला कितीशी मारक ठरते, हे पोर्तुगालविरुद्ध होणाऱ्या पहिल्या लढतीदरम्यान समजेल. नवे प्रशिक्षक फर्नांडो हिएरोंपुढे मोठे आव्हान आहे, पण ९० सामन्यांत स्पेनसाठी २९ गोल करणाºया हिएरोंकडे प्रचंड अनुभव आहे. कर्णधार सर्गिओ रामोस हा हिएरोंसारखा मोठा बचावपटू. हिएरो चार विश्वचषक खेळले, त्यामुळे या दोघांचे ‘ट्युनिंग’ होईल, असे वाटते. दुसरीकडे, पोर्तुगालकडे रोनाल्डो आहे, पण युरोविजेत्यांचा संघ स्पेनएवढा समतोल व तुल्यबळ निश्चित नाही. ही महत्त्वाची लढत दोन्ही संघ कसे खेळतात, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
स्पेनला जसा धक्का बसला, तसा मोरोक्कोलाही बसला. त्यांची २०२६च्या विश्वस्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत हार झाली. त्यांची पहिली लढत इराणविरुद्ध झाली. मोरोक्को हे फूटबॉलमधील मोठे प्रस्थ नाही, पण त्यांनी जगाला सैद आॅइता आणि हिकम एल गेरुस यांसारखे आॅलिम्पिक, विश्वविजेते आणि विश्वविक्रमवीर दिले. त्यांचा एक चाहता, युसेफ इब्न खालदून याच्याशी क्रेमलिनमध्ये बातचीत केली. आपला संघ एखाद्या बड्या संघाला म्हणजे स्पेन-पोर्तुगालला चकित करेल, असा आशावाद त्याच्यापाशी दिसला. बोलण्याच्या ओघात त्याने विचारले, ‘तुम्ही फूटबॉलमध्ये मागे का पडला?’ त्याला म्हटले, ‘कशामुळे हे तू सांगशील?’ तो झटकन म्हणाला, ‘टू मच क्रिकेट! टू मच मनी देअर!’ अगदी थोडक्यात तो वास्तव सांगून गेला. माझा भारत विश्वचषकात नाही, याचे शल्य त्या परक्यालाही वाटत होते.