भारतीय खेळाडूंची कठीण परीक्षा, अखेरचा साखळी सामना : माजी विजेत्या घानाविरुद्ध आज लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:37 IST2017-10-12T00:37:21+5:302017-10-12T00:37:40+5:30

पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल.

 The tough test of the Indian players, the last league match: The former champions are fighting against Ghana today | भारतीय खेळाडूंची कठीण परीक्षा, अखेरचा साखळी सामना : माजी विजेत्या घानाविरुद्ध आज लढत

भारतीय खेळाडूंची कठीण परीक्षा, अखेरचा साखळी सामना : माजी विजेत्या घानाविरुद्ध आज लढत

नवी दिल्ली : पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल. घानासारख्या कसलेल्या संघाविरुद्ध भारताच्या युवा खेळाडूंची कठीण परीक्षा होईल.
स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अमेरिकाविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताच्या युवा संघाने कोलंबियाविरुद्ध जबरदस्त झुंज दिली. कोलंबियाविरुद्ध शानदार खेळ करताना भारतीयांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यातही पराभव झाला असला, तरी भारतीय युवा खेळाडूंनी आम्ही मोठ्या संघांविरुद्धही आव्हान निर्माण करु शकतो, हे दाखवून दिले. प्रशिक्षक लुईस नॉर्टन डि मातोस यांनी आखलेल्या बचावात्मक रणनीतीचा भारतीय संघाने कोलंबियाविरुध्द चांगल्याप्रकारे अवलंब केला. जर, का नशिबाने साथ दिली असती, तर भारतीय युवांनी या सामन्यात कोलंबियाविरुद्ध धक्कादायक निकालही नोंदवला असता.
दरम्यान, घानाविरुद्धही हाच जोश कायम ठेवून कोलंबियाविरुद्ध केलेला खेळ फ्ल्यूक नव्हता हे सिद्ध करण्याचे आव्हान भारतीय युवांपुढे असेल. दुसरीकडे, गटातील सर्वात ताकदवान संघ असलेल्या घानाविरुद्ध आव्हान उभे करणे भारतासाठी सहज शक्य होणार नाही. या सामन्यात तेच संभाव्य विजेते असतील. ‘अ’ गटातून अमेरिकेने सलग दोन विजय मिळवत बाद फेरी गाठली असून, कोलंबिया आणि घाना यांचे प्रत्येकी ३ गुण आहेत. या दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्यासाठी आपल्या अखेरच्या गटसाखळी सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्याचवेळी, भारताच्या खात्यात एकही गुण नसून जरी विजय मिळवण्यात भारत यशस्वी ठरला, तरी बाद फेरी त्यांच्यासाठी धूसरच असेल.
आतापर्यंतच्या रणनीतीनुसार केलेल्या खेळावर प्रशिक्षक मातोस भारतीय युवांवर समाधानी आहेत. आक्रमकतेवर भारतीयांना आणखी सुधारणा करावी लागेल, त्यांनी म्हटले आहे. गोलरक्षक धीरज सिंग भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, अन्वर अली, नमित
देशपांडे यांनीही बचावफळीत चांगले प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि कोलंबियाच्या प्रशिक्षकांनी अन्वरच्या खेळाचे कौतुकही केले. त्याचवेळी, भारताला आक्रमकांकडूनही सर्वाधिक आशा असेल. (वृत्तसंस्था)

Web Title:  The tough test of the Indian players, the last league match: The former champions are fighting against Ghana today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.