तिरंगी फुटबॉल मालिका : भारत-सेंट किट्स नेविस लढत आज, टीम इंडियाचा सलग दहाव्या विजयाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 02:05 AM2017-08-24T02:05:04+5:302017-08-24T02:05:19+5:30
मॉरिशसविरुद्ध पिछाडीवरून बाजी मारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ गुरुवारी तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस विरुद्ध विजयाच्या निर्धाराने उतरेल.
मुंबई : मॉरिशसविरुद्ध पिछाडीवरून बाजी मारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ गुरुवारी तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस विरुद्ध विजयाच्या निर्धाराने उतरेल. विशेष म्हणजे या सामन्यात विजय मिळवून भारत सलग दहावा आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईतील अंधेरी येथील
मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर हा सामना रंगेल.
भारतीय संघ सेंट्स किट्स आणि नेविसला गृहीत धरण्याची चूक करणार नाही. ५ सप्टेंबरला होत असलेल्या आशियाई चषक पात्रता स्पर्धेतील मकाऊविरुद्धच्या सामन्याची पूर्वतयारी म्हणून भारताला ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. भारताने आपल्या मागील आठ अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांसह भूतानविरुद्धचा अनौपचारिक मैत्री सामनाही जिंकला होता. मॉरिशसविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने रॉबिन सिंग आणि बलवंत सिंग यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर २-१ असा विजय मिळवला. त्याचवेळी, प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन पहिल्या सामन्याप्रमाणेच सेंट किट्स आणि नेविसविरुद्धही युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात अमरिंदर सिंग, निखिल पुजारी आणि मनवीर सिंग यांना आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
भारताकडून आक्रमक रॉबिन आणि बलवंत आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. तसेच जेजे लालपेखलुआ आणि युवा मनवीर यांच्याकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. बचावामध्ये कर्णधार संदेश झिंगन महत्त्वपूर्ण ठरेल.