‘खरा’ विश्वचषक चोरीला... १९८३ ची घटना; १.८ किलो सोन्याच्या ट्रॉफीची ब्राझीलकडून भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:49 AM2018-06-05T02:49:21+5:302018-06-05T02:49:21+5:30
जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम जिंकणाऱ्या देशाला कधीही फिफा विश्वचषकाचा ‘खरा’ चषक प्रदान केला जात नाही. तथापि १९७० मध्ये तिस-यांदा जेतेपदाचा मान मिळविणा-या ब्राझील संघाला त्यावेळी खराखुरा चषक देण्यात आला.
नवी दिल्ली : जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम जिंकणाऱ्या देशाला कधीही फिफा विश्वचषकाचा ‘खरा’ चषक प्रदान केला जात नाही. तथापि १९७० मध्ये तिस-यांदा जेतेपदाचा मान मिळविणा-या ब्राझील संघाला त्यावेळी खराखुरा चषक देण्यात आला. मात्र, नंतर चषकाचा हा अनमोल वारसा रहस्यमयरीत्या चोरीला गेला होता आणि क्रीडाविश्वात मोठी खळबळ माजली होती.
फिफा विश्वचषक ट्रॉफीचे नाव १९७० पर्यंत फिफाचे माजी अध्यक्ष ज्युलेस रिलेल चषक असे होते. कुठल्याही विजेत्या संघाला खराखुरा चषक दिला जात नव्हता, पण जेतेपदाचा तिसºयांदा मान मिळविणाºया ब्राझीलला खरा चषक देण्यात आला. ब्राझील फुटबॉल संघाने हा चषक रियो दि जेनेरियोच्या आपल्या मुख्यालयातील एका बुलेटप्रूफ काचेच्या कपाटात ठेवला होता. परंतु, १९ डिसेंबर १९८३ रोजी अज्ञात व्यक्तीने हातोड्याने कपाटाचा मागील भाग तोडून चषक पळवला. याप्रकरणी चार जणांना ताब्यातही घेण्यात आले. त्यांच्यावर खटला चालविण्यात आला, पण खरा चषक पुन्हा सापडलाच नाही.
हा सुवर्ण चषक वितळवून चोरट्यांनी सोने विकल्याचीही अफवा उठली होती. असे असले तरी, चषकाच्या खालचा भाग मात्र मिळाला. ‘फिफा’ने ही वस्तू झुरिचच्या मुख्यालयात ठेवली आहे. नंतर ब्राझील फुटबॉल संघाने १.८ किलो सोन्याच्या चषकाची प्रातिकृती तयार केली आणि ती तत्कालीन राष्टÑपती जोओ फिगुइरेडो यांना सोपविली. ब्राझीलला १९७० मध्ये चषक मिळाल्यापासून याचे नाव फिफा विश्वचषक असे ठेवण्यात आले. सध्याचा चषक १८ कॅरेट सोन्याने तयार करण्यात आला आहे. या चषकाचे वजन ६.१ किलो आणि उंची ३६.८ सेंटीमीटर आहे. इटलीच्या एका कंपनीने हा चषक बनवला असून त्यावर मनुष्यांनी पृथ्वीचा भार आपल्या खांद्यावर उचलले असल्याची चित्रे अंकित करण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)
जर्मनी, पेरू, डेन्मार्क संघांची घोषणा
फँकफर्ट : गतविजेत्या जर्मनीच्या विश्वकप फुटबॉल संघात युवा लेरॉय सेनच्या स्थानी अनुभवी गोलकिपर मॅन्युअल न्यूयेरला संधी देण्यात आली आहे. मँचेस्टर सिटीला प्रीमिअर लीगमध्ये जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया २२ वर्षीय सेनची ‘प्रोफेशनल फुटबॉल असोसिएशन’ने वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड केली, पण प्रशिक्षक जोकिम ल्यू यांच्या २३ सदस्यांच्या संघात स्थान मिळवण्यासाठी हे पुरेसे नव्हते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर न्यूयेर शनिवारी प्रथमच आॅस्ट्रियाविरुद्धच्या मैत्री लढतीत सहभागी झाला. संघाला या लढतीत २-१ ने पराभव स्वीकारावा लागला.
पाऊलो गुइरेरोचा
पेरू संघात समावेश
लीमा : डोपिंगच्या बंदीतून मुक्त कर्णधार व संघाचा मुख्य स्कोअरर पाऊलो गुइरेरोची सोमवारी पेरू देशाच्या २३ सदस्यीय विश्वकप संघात निवड करण्यात आली. गुइरेरोला स्थान देण्यात आल्यामुळे मिडफिल्डर सर्जियो पेनाला बाहेर करण्यात आले.