१७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक : ‘ग्रुप आॅफ डेथ’ची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 03:44 AM2017-10-05T03:44:38+5:302017-10-06T11:42:51+5:30
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार सुरु होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना, स्पर्धेतील सहभागी सर्वच संघांनी कंबर कसली आहे.
कोलकाता : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार सुरु होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना, स्पर्धेतील सहभागी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. त्यातही स्पर्धेतील ‘एफ’ गटाकडे फुटबॉलप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. एकूण ६ गटांमध्ये विभागणी झालेल्या या स्पर्धेच्या ‘एफ’ गटामध्ये मेक्सिको, चिली, इंग्लंड या बलाढ्य संघांचा समावेश असल्याने या गटाला ‘ग्रुप आॅफ डेथ’ असेही संबोधले जात आहे. या तीन संघांव्यतिरिक्त इराकचाही या गटात समावेश असून गटसाखळीचा अडथळा पार करण्यासाठी इराकपुढे तगडे आव्हान असेल.
या गटामध्ये इंग्लंड संघाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. कठीण गट मिळाल्यानंतरही सुरुवातीचे अडथळे पार करुन इंग्लंड संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत स्थान मिळवेल, असा विश्वास फुटबॉलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इंग्लंड संघ १७ वर्षांखालील यूरोपियन चॅम्पियन स्पर्धेत उपविजेता राहिला आहे. त्यामुळे, त्यांना गृहीत धरण्याची चूक प्रतिस्पर्धी संघ नक्कीच करणार नाहीत.
फीफा स्पर्धेच्या प्रत्येक स्पर्धेत मजबूत संघ म्हणून सहभागी होणारा इंग्लंड १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी आतापर्यंत केवळ तीनवेळाच पात्र ठरला आहे. त्यातही दखल घेण्याची बाब म्हणजे, इंग्लंड २००७ साली पहिल्यांदा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला होता. म्हणजेच, स्पर्धा सुरु होऊन तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इंग्लंडने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठून इंग्लंडने या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. मात्र, यंदा झालेल्या १७ वर्षांखालील यूरो कप स्पर्धेतील कामगिरी पाहता, इंग्लंडला यंदा नक्कीच गृहीत धरता येणार नाही. इंग्लंडसाठी आनंदाची बाब म्हणजे राष्ट्रीय संघाकडून खेळणारा स्टार फुटबॉल जेडन सेंचो साखळी फेरीसाठी त्यांच्यासाठी उपलब्ध असेल. ८ आॅक्टोबरला होणाºया चिलीविरुध्दच्या सलामीच्या लढतीआधी तो संघासह जुळेल अशी आशा आहे.
मॅक्सिकोचा धडाका...
दोन वेळा १७ वर्षांखालील विश्वचषक उंचावलेल्या मॅक्सिकोने आतापर्यंत एकूण १२ वेळा या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. २००५ आणि २०११ साली मॅक्सिकोने विश्वचषक उंचावला होता. शिवाय या संघाला एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळेच, मॅक्सिको संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीतील आघाडीचा संघ आहे. गत स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिला मॅक्सिको यंदा आपली छाप पाडण्यास आतुर आहे. प्रशिक्षक मारियो आर्टेगा यांनी २०१४ सालापासून संघाची धुरा आपल्याकडे घेतल्यानंतर मॅक्सिकोने सातत्याने चमदार कामगिरी केली आहे. शिवाय मॅक्सिकोने सलग तीनवेळा कानकॅफ चॅम्पियनशीपही पटकावली आहे. त्यामुळेच हा संघ सर्वात धोकादायक आहे.
चिलीचा ‘तडका’... गेल्या स्पर्धेत यजमान असलेला चिली संघ यंदा चौथ्यांदा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळेल. चिलीने १९९३ साली पहिल्यांदा या स्पर्धेत खेळताना पदार्पणातच तिसरे स्थान पटकावले होते. या संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. चिलीचा गोलरक्षक ज्यूलिओ बोरक्वेज याच्यावर संघाची मदार असेल. मार्च महिन्यात दक्षिण अमेरिका १७ वर्षांखालील स्पर्धेत त्याची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड झाली होती. बोरक्वेजने चार सामन्यांत एकही गोल न स्वीकारता १९९७ नंतर पहिल्यांदा चिलीला १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला.
इराकचा दम... इराकचा संघ याआधी केवळ २०१३ साली १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी, साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांत इराकचा पराभव झाला होता. परंतु, यंदा इराकचा संघ फॉर्ममध्ये दिसत असल्याने हा ‘एफ’ गटातील चुरस शिगेला पोहचली आहे. एएफसी १६ वर्षांखालील चॅम्पियनशीप पटकावून इराकने या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. परंत्य्, एफ गटतील इतर बलाढ्य संघांमुळे पुन्हा एकदा इराकची वाट बिकट बनली आहे.