जर्मनी, ब्राझीलला अनपेक्षित धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:58 AM2018-06-19T03:58:06+5:302018-06-19T03:58:06+5:30

कोणत्याही स्पर्धेची पहिली चकमक मोठी डोकेदुखी असते. याचा नेमका अनुभव आला तो गतविजेत्या जर्मनीला, तसेच त्याआधी अर्जेंटिनाला आणि त्यानंतर ब्राझीललाही.

Unexpected push to Germany, Brazil | जर्मनी, ब्राझीलला अनपेक्षित धक्का

जर्मनी, ब्राझीलला अनपेक्षित धक्का

Next

- रणजीत दळवी
कोणत्याही स्पर्धेची पहिली चकमक मोठी डोकेदुखी असते. याचा नेमका अनुभव आला तो गतविजेत्या जर्मनीला, तसेच त्याआधी अर्जेंटिनाला आणि त्यानंतर ब्राझीललाही. जर्मनीसाठी तर तो मोठा धक्काच होता. त्याचे परिणाम कदाचित त्यांना भोगावे लागणार नाहीत, पण न जाणो भोगावे लागतीलही. स्वीडनला पराभूत करणे त्यांच्यासाठी आवश्यक झाले आहे. जेव्हा तुम्ही गतविजेते असता आणि अव्वल स्थानाचे दावेदारही, तेव्हा तुमच्यावर प्रचंड दबाव असतो. मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत तो दबाव किती हे उत्तरार्धातील त्यांच्या खेळाने सप्रमाण सिद्ध केले. हिर्विंग लोझानोचा तो गोल उतरविण्याचे त्यांंनी आटोकाट प्रयत्नही केले. पण त्यात सुनियोजितपणा तर नव्हताच, पण प्रतिस्पर्ध्यांनी उभ्या केलेल्या भक्कम तटबंदीला खिंडार पाडण्यासाठी काही वेगळे करून दाखविण्यातही त्यांना अपयश आले. शिवाय जेव्हा जेव्हा त्यांना चेंडू गोलच्या दिशेने मारण्यात यश आले, तेव्हा प्रतिस्पर्धी गोलरक्षक गियेमो ओचोआ त्यांच्या मार्गात अडथळा आणणारा बुलंद बुरुज ठरला.
दोन्ही बाजूने केलेले क्रॉसेस विफल ठरविल्यावर मेसुट ओझिल, बोआटेंग, रुस, गोमेझ, क्रूस, म्युलर यांनी दुरूनच तोफा डागून मेक्सिकोचा किल्ला पाडण्याचे प्रयत्न केले. पण त्या तोफगाळ्यांमध्ये ना दारू ठासून भारलेली, की ते लक्ष्यावर जाऊन आदळले. परिणाम व्हायचे तेच झाले. मनोबलाला मोठा तडा देणारा पराभव पदरी पडला. आता जर्मन माध्यमांमध्ये जो टीकेचा भडिमार होईल त्यामुळे मनोबल आणखीनच खच्ची होण्याचा संभव आहे. जोअकिम लो यांना संघाला स्वत:च निर्माण केलेल्या धगधगत्या खाईतून बाहेर काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. इंग्रजीत सांगायचे झाल्यास, ‘जर्मनी हॅज इट्स वर्क कट आऊट!’ मोठा डोंगर चढावयाचा आहे आता!
त्या तुलनेत ब्राझीलची अवस्था त्यांच्याइतकी बिकट निश्चित नाही. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत याच जर्मनीकडून सपाटून मार खाल्लेल्या ब्राझीलला स्वित्झर्लंडशी झालेली बरोबरी तशी समाधानकारक असली, तरी त्यांच्या जगभरातील चाहत्यांचे समाधान होणे अशक्य. त्यांना त्यांच्या नजाकतभऱ्या खेळाची प्रतीक्षा आहे. बरे तोही परिणामकारक असाच हवा. आजच्या ब्राझील संघात नेमार सोडला, तर तसा सुपरस्टार कोणीच नाही. आहे का एखादा पेले, रोमारिओ, रोनाल्डो किंवा रिव्हाल्डो अथवा झिको जो हमखास यश मिळवून देईल? नेमारपाशी नजाकत आहे, पण कोठे थांबावयाचे हे त्यास ठाऊक नाही. जेथे पुढे जायचे मार्ग बंद आहेत तेथे डोके आपटत बसायचे आणि प्रतिस्पर्ध्यांकडून फुकाचा चोप घ्यायचा, तो कशासाठी? जर्मनी आणि ब्राझील यांनी अधूनमधून अप्रतिम खेळ केला. पण त्यामुळे विश्वचषकाला गवसणी घालता येईल? जर्मनीने स्वत:ला नशीबवान मानावे. प्रतिहल्ले करण्यावर भर देणाºया मेक्सिकोने मिळालेल्या अर्धा डझन संधी साधल्या असत्या तर? लायून, ग्वार्दादो, हाविअरे हर्नांडिस, चिचारिटो यांनाही जर्मनीच्या फॉर्वडर््सची घिसाडघाई या व्याधीची बाधा त्वरित झाली. जर्मनीने खरे तर त्यांचे आभार मानावयास हवेत. कारण त्यांच्यामुळे मोठा पराभव टळला. ब्राझीलला त्यामानाने कमी कष्ट करावे लागले, तरी त्यांच्या मार्गातले अडथळे काय तीव्रतेचे हे प्रत्यक्षात त्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मैदानातच समजून येईल. तेव्हा कोणीही आपला पूर्वेतिहास, प्रतिष्ठा, सुपरस्टार्सची उपलब्धता या गोष्टी आपल्याला तारतील या भ्रमात राहू नये.

Web Title: Unexpected push to Germany, Brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.