Video: गोल अडवताना फुटबॉल गोलकीपरचा मृत्यू, मैदानात शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 07:59 AM2017-10-17T07:59:11+5:302017-10-17T09:20:49+5:30
या अपघातानंतर छाती पकडून मैदानात विव्हळताना दिसत होता. या घटनेनंतर चोईरुलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र, तोपर्यंत..
जकार्ता - गोल अडवण्याच्या प्रयत्नात फुटबॉलच्या मैदानावर झालेल्या अपघातात गोलकिपरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंडोनिशियात घडली आहे. इंडोनेशिया फुटबॉल सुपर लीगमध्ये इंडोनेशियाचा दिग्गज गोलकिपर चोईरुल हुडा याची आपल्याच संघातील खेळाडूशी टक्कर झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने मैदानात एकच शांतता पसरली. फुटबॉल मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडुला गोल करण्यापासून रोखताना झालेल्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी इंडोनेशियातील एका स्थानिक सामन्यात चोईरुल खेळत होता. यावेळी समोरुन गोल करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूच्या गुडघ्याचा जोरदार फटका लागल्याने चोईरुल जागीच कोसळला.
व्हिडिओ फुटेजमध्ये हुडा या अपघातानंतर छाती पकडून मैदानात विव्हळताना दिसत होता. या घटनेनंतर चोईरुलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र, तोपर्यंत चोईरुलचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात आणण्यापूर्वीच चोईरुलला हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला.
पार्सेला लामोनगन क्लबच्या रविवारी झालेल्या फुटबॉल सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये 38 वर्षीय चोइरुल हुडा या गोलकिपरची गोल अडवण्यासाठी धडपड सुरू होती. गोल अडवण्यासाठी म्हणून तो पुढे आला, त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघाला भिडणारा ब्राझिलचा खेळाडून रामोन रोड्रिगेज याची हुडाशी टक्कर झाली. रोड्रिगेज आणि हुडा यांनी गोल अडवला पण टक्कर इतकी जबरदस्त होती की हुडाला मैदान सोडावं लागलं आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी मैदानात शांतता पसरली.
खेळ संपल्यावर दोन्ही संघाचे खेळाडू रुग्णालयात पोहोचले, पण डॉक्टरांनी हुडाला मृत घोषित केले आणि साऱ्यांना धक्का बसला. 1999 पासून पार्सेला क्लबसाठी हुडा 503 सामने खेळला होता. चोईरुलच्या जाण्याने सध्या इंडोनेशियातील स्थानिक क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.