वेगे वेगे धावू..!
By स्वदेश घाणेकर | Published: July 15, 2018 04:38 AM2018-07-15T04:38:07+5:302018-07-15T04:38:55+5:30
सोमवारपासून रशिया दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात करेल.. गेला महिनाभर किंबहुना त्या आधीपासूनच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमुळे येथील नागरिक दैनंदिन कामे विसरली होती.
सोमवारपासून रशिया दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात करेल.. गेला महिनाभर किंबहुना त्या आधीपासूनच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमुळे येथील नागरिक दैनंदिन कामे विसरली होती. संपूर्ण देश फुटबॉलमय झाला होता. त्यात कधी नव्हे ते यजमान संघाने मारलेल्या मुसंडीने पुढील दोन-तीन महिने फुटबॉलचा हा ज्वर कायम राहील अशी चिन्हे होती. रशियन्सचे दुर्दैव आणि अस्सल फुटबॉलप्रेमींच्या सुदैवाने तसे घडले नाही.
हीस्पर्धा अनपेक्षित निकालापलीकडे लक्षात राहील ती प्रत्येक खेळाडूच्या अॅटिट्यूडमुळे.. येथे कोणी दिग्गज नाही, सर्व एकाच नावेतील प्रवासी... कठीण प्रसंगी जो संघाला तारेल तो त्या दिवसापुरता नायक.. पुढे पुन्हा शून्यापासून सुरुवात... हीच विश्वचषक स्पर्धेची खरी गंमत आहे.. आणि ते यंदा जाणवले... ख्रिस्तीयानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, थॉमस म्युलर, मोहम्मद सलाह.. आदी महानतेच्या पंगतीत बसणारी नावे मागे राहिली आणि भलतेच चमकले... हे केवळ खेळाडूंच्या बाबतीतच नव्हेतर, संघांच्या वाट्यालाही हाच अनुभव आला... जर्मनी, अर्जेंटिना, पोतुर्गाल, उरुग्वे ही जेतेपदाची दावेदार मंडळी कधी गायब झाली तेच कळले नाही किंवा त्यांचे जाणे मनाला अद्याप पटलेले नाही.
क्रोएशिया, बेल्जियम ही नावे गेली कित्येक वर्षे केवळ बाद फेरीपर्यंतच कानावर यायची. ती चक्क उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत कानात खणखणत आहेत. इंग्लंड आणि फ्रान्स यांचा सुरुवातीपासून अंदाज बांधणे अवघडच होते. त्यामुळे ते जेतेपदाच्या शर्यतीत असून नसल्यासारखेच.. पण तरीही सर्व तर्क चुकवून मुसंडी मारलीच.. हे असे का झाले, त्याला अनेक कारणे आहेत. स्पर्धेबाहेर फेकले गेलेले ब्राझील आणि उरुग्वे वगळता यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील कथित जेतेपदाचे दावेदार नवख्यांसमोर भुईसपाट झाले. त्याला कारण त्यांची पारंपरिक शैली... जर्मनी, अर्जेंटिना आणि स्पेन यांनी त्यांची विशिष्ट शैली जपली आहे; आणि त्याच पद्धतीन ते खेळतात, हे आता सर्वांनाच माहीत झाले आहे. त्यामुळे त्यात फार बदल होणार नाही हे अन्य संघांनी हेरले आणि त्यानुसार खेळ केला.
आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धांत सर्वाधिक गोल रशियात नोंदले गेले. बेल्जियमसारख्या संघाच्या खात्यात सर्वाधिक १४ गोल्स आहेत. त्यापाठोपाठ इंग्लंड, क्रोएशिया यांनी प्रत्येकी १२ गोल केले आहेत. रशिया व फ्रान्स यांनीही गोलचा दुहेरी टप्पा गाठला. यापैकी रशिया वगळता चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली. आक्रमणाचे अस्त्र त्यांनी यशस्वीपणे वापरत स्पर्धेत आगेकूच केली. केवळ आक्रमकतेवर विसंबून न राहता या सघांनी बचावभिंतही तितकीच मजबूत केली. यंदाच्या स्पर्धेचे विश्लेषण करताना ससा- कासवाची गोष्ट आठवते. केवळ आक्रमक खेळ करण्यापेक्षा संयम व सातत्याने खेळलो, तर विजय निश्चितच आपल्यासमोर नतमस्तक होतो. क्रोएशिया व बेल्जियम या संघांनी ते दाखवून दिले आहे. जेतेपदाचे सर्व दावेदार यंदा सशाच्या भूमिकेत होते. त्यामुळेच आता ‘वेगे वेगे धावण्याच्या’ शर्यतीत पुन्हा कासव जिंकला तर आश्चर्य वाटणार नाही.