जेव्हा गतविजेत्यांची सुरुवातच पराभवाने होते....!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 11:49 PM2018-06-17T23:49:33+5:302018-06-17T23:49:33+5:30
२०१४ च्या विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला रशिया २०१८ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
-ललित झांबरे
२०१४ च्या विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला रशिया २०१८ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. मेक्सिकोने त्यांना लोझानोच्या ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलआधारे १-० अशी मात देत खळबळ उडवून दिली. यासह अर्जेंटीना, फ्रान्स आणि स्पेन या गतविजेत्यांच्या पंक्तीत आता जर्मनीने स्थान मिळवले आहे. या चारही संघांनी विश्वविजेतेपदानंतरच्या पुढच्या विश्वचषकातील पहिलाच सामना गमावला आहे. यात अर्जेंटीनाचा संघ विशेष ठरतो कारण त्यांनी दोन वेळा विश्वचषक जिंकला (१९७८ व १९८६) आणि त्यानंतर दोन्ही वेळा पुढच्या विश्वचषकात (१९८२ व १९९०) ते पहिल्याच सामन्यात पराभूत झाले.
१३ जून १९८२ ला एर्विन व्हँडेरबर्गच्या दुसºया सत्रातील गोलाआधारे बेल्जियमने गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० अशी मात दिली होती. पुन्हा अर्जेंटीनावरच अशी वेळ आली ती ८ जून १९९० रोजी. यावेळी त्यांना कॅमेरूनने धक्का दिला. या सामन्यातील एकमेव गोल फ्रँकाईस ओमान बियीक याने हेडरवर केला होता. फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक जिंकला होता परंतु २००२ च्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्यांना सेनेगेलने १-० अशी मात दिली. पापा बौबा डियोपच्या गोलाने गतविजेत्यांना पराभव पत्करण्यास भाग पाडले.
गेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी स्पॅनिश संघ विश्वविजेता म्हणून मैदानात उतरला पण १३ जून २०१४ रोजी त्यांच्या पहिल्याच सामन्यात नेदरलँडस्ने त्यांचा ५-१ असा धुव्वा उडवला होता. या सामन्यात स्पेनसाठी पहिला गोल अलान्सोने २७ व्या मिनिटाला केला होता परंतु त्यानंतर नेदरलँङसाठी व्हॅन पर्सीने ४४ व ७२ व्या मिनिटाला, रॉबेनने ५३ व ८० व्या मिनिटाला आणि स्टीफन डी वीज याने ६४ व्या मिनिटाला गोल करत गतविजेत्यांना लाजिरवाणा पराभव स्विकारायला लावला होता.
त्यानंतर आता जर्मनीला मेक्सिकोने धक्का दिला आहे. योगायोग म्हणजे जर्मनीने आजच्या या पराभवाच्या तारखेलाच म्हणजे १७ जून रोजी १९९४ च्या विश्वचषकात मात्र गतविजेते म्हणून विजयी सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांनी बोलिव्हियावर १-० असा विजय मिळवला होता. यावेळी मात्र विजय तर सोडा, पण ते पराभवसुद्धा टाळू शकले नाहीत. विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच सामन्यात जर्मनीचा १९८२ नंतर हा पहिलाच पराभव आहे आणि १९७८ नंतर प्रथमच ते आपल्या सलामीच्या विश्वचषक सामन्यात एकही गोल करू शकलेले नाहीत.
विश्वचषकात पहिल्याच सामन्यात पराभूत गतविजेते
१९८२ अर्जेंटिना पराभूत वि. बेल्जियम ०-१
१९९० अर्जेंटिना पराभूत वि. कॅमेरून ०-१
२००२ फ्रान्स पराभूत वि. सेनेगेल ०-१
२०१४ स्पेन पराभूत वि. नेदरलँडस् १-५
२०१८ जर्मनी पराभूत वि. मेक्सिको ०-१