कोणता ‘स्टार’ चमकणार? बलाढ्य खेळाडूंवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:52 AM2018-06-11T04:52:11+5:302018-06-11T04:52:11+5:30

गुरुवारपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले असून, त्याच वेळी यंदाच्या स्पर्धेत कोणता ‘स्टार खेळाडू’ आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Who will Star in this FIFA World Cup | कोणता ‘स्टार’ चमकणार? बलाढ्य खेळाडूंवर लक्ष

कोणता ‘स्टार’ चमकणार? बलाढ्य खेळाडूंवर लक्ष

Next

नवी दिल्ली : गुरुवारपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले असून, त्याच वेळी यंदाच्या स्पर्धेत कोणता ‘स्टार खेळाडू’ आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध लीगच्या माध्यमातून क्लब फुटबॉल गाजवणारे स्टार फुटबॉलपटू आपल्या देशाकडून खेळताना कशी कामगिरी करतात, याचीच उत्सुकता सध्या सर्वांना लागली आहे.
या सर्वांमध्ये आघाडीची चर्चा होत आहे ती, अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीची. फुटबॉल विश्वातील सर्वच प्रतिष्ठित पुरस्कार पटकावलेल्या या खेळाडूची जादू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मात्र म्हणावी तशी दिसली नाही. क्लब फुटबॉलमध्ये जवळपास सर्वच स्पर्धा जिंकलेल्या मेस्सीला अद्याप आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकता आलेला नाही आणि हीच बाब त्याच्या जादुई कारकिर्दीतील सर्वात मोठी कमतरता ठरत आहे. मेस्सी किती महान आहे, हे सिद्ध करण्यासाठी नक्कीच विश्वचषकसारख्या स्पर्धेची आवश्यकता नाही; परंतु नेहमीच दिग्गज दिएगो मॅरोडोनासह तुलना होताना मेस्सी विश्वचषकच्या बाबतीत मागे पडतो आणि हीच गोष्ट त्याला आणि त्याच्या करोडो पाठीराख्यांना सलते. त्यामुळेच यंदा बार्सिलोना एफसीचा हा स्टार खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वचषक पटकावण्यास उत्सूक आहे. विशेष म्हणजे, ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने त्याच्याकडून अर्जेंटिनाला खूप मोठ्या आशा आहेत. त्याचबरोबर मेस्सी फॉर्ममध्ये असेल, तर अर्जेंटिनाला कोणीही विजयापासून रोखू शकणार नाही, हेही तितकेच खरे आहे. दुसरीकडे, पोर्तुगालचा हुकमी एक्का आणि मेस्सीचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला ख्रिस्तिआनो रोनाल्डोकडेही संपूर्ण जगाचे लक्ष असेल. मेस्सीच्या तोडीस तोड असलेला रोनाल्डोची गोष्टही वेगळी नाही. क्लब स्तरावर जवळपास सर्व पुरस्कारांवर कब्जा केलेल्या या स्टार खेळाडूलाही आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकता आलेला नाही. तरी २०१६ साली झालेल्या युरो चषक स्पर्धेत रोनाल्डोने आपला धडाका सादर करत पहिल्यांदाच पोर्तुगालला जेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे या विश्वचषकामध्येही पोर्तुगालला आपल्या या स्टारकडून खूप मोठ्या आशा आहेत. ज्या ताकदीने आणि अत्यंत कल्पकतेने रोनाल्डो खेळतो, ते फुटबॉलविश्वात सर्वात लक्षवेधी असल्याचे म्हटले तरी वावगे ठरत नाही. त्याच्यासारखा स्टायलिश खेळाडू क्वचितच दिसून येतो.
रियाल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोने गेल्या पाच मोसमांत चार वेळा चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच, गेल्या पाच वर्षांपासून ‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा सम्मान मिळवणे त्याच्यासाठी शानदार यश ठरले. असे असले, तरी देशाला विश्वविजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न आतपर्यंत त्याला साकारता आलेले नाही. यासाठीच यंदा तो त्वेषाने खेळेल यात शंका नाही. (वृत्तसंस्था)


ब्राझीलला एकट्या नेमारवर विश्वास....

पाच वेळचा विश्वविजेता ब्राझील संघ यंदा पूर्णपणे नेमारवर अवलंबून आहे. पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याने तीन महिन्यांच्या कालावधीने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. क्रोएशियाविरुद्धच्या सराव सामन्यात तो ४५ मिनिटे मैदानावर उतरला होता आणि नेमारच्या उपस्थितीने आत्मविश्वास उंचावलेल्या ब्राझीलने २-० असा विजय मिळवला. या सामन्यात नेमारने एक गोल करून आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचेही सिद्ध केले.

२०१४ साली यजमान म्हणून खेळत असलेल्या ब्राझीलला उपांत्यपूर्व सामन्यात मोठा धक्का बसला होता. या वेळी नेमारच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यानंतर नेमारने २०१६ रिओ आॅलिम्पिकमध्ये ब्राझीलला पहिले सुवर्ण मिळवून दिले.

२०१४ साली यजमान म्हणून खेळत असलेल्या ब्राझीलला उपांत्यपूर्व सामन्यात मोठा धक्का बसला होता. या वेळी नेमारच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यानंतर नेमारने २०१६ रिओ आॅलिम्पिकमध्ये ब्राझीलला पहिले सुवर्ण मिळवून दिले.

इजिप्तच्या आशा सलाहवर...
यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी केलेला मोहम्मद सलाह हा देखील स्टार खेळाडूंच्या पंक्तीत आला आहे. मात्र, चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने त्याला काहीकाळासाठी खेळापासून दूर रहावे लागणार आहे आणि यामुळे इजिप्तच्या चिंतेत भर पडली आहे. संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलाह उरुग्वेविरुद्ध होणारा सलामीचा सामना खेळणार नाही. परंतु, यानंतर मात्र तो उपलब्ध असेल. सलाहच्या जोरावर इजिप्तने तब्बल २८ वर्षांनी पहिल्यांदाच व एकूण तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

सुआरेजवरही लक्ष...
उरुग्वेच्या लुईस सुआरेजवरही सर्वांचे लक्ष असेल. गेल्यावेळी त्याने इटलीविरुद्धच्या सामन्यात बचावपटू जॉर्जिओ चिलनी याचा चावा घेतला होता. यानंतर त्याच्यावर ९ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

या तीन स्टार व्यतिरिक्त...
इजिप्तचा मोहम्मद सलाह, फ्रान्सचा पॉल पोग्बा, जर्मनीचा टिमो वर्नर आणि थॉमस मुलर, कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेज, स्पेनचा दिएगो कोस्टा, उरुग्वेचा लुई सुआरेज आणि स्पेनचा गोलरक्षक डेव्हिड डिगिया यांच्यावरही जागतिक फुटबॉलचे विशेष लक्ष असेल. एकूणच, केवळ काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेत सर्वोच्च दर्जाचा खेळ होणार असून, यामध्ये कोणता स्टार आपला दर्जा सिद्ध करतो, याची उत्सुकता ताणली
गेली आहे.

2006 साली पहिल्यांदा विश्वचषक खेळताना रोनाल्डोच्या संघाने चौथे स्थान
पटकावले होते. मात्र, यानंतरच्या दोन स्पर्धांमध्ये पोर्तुगालची कामगिरी
ढासळली. त्या वेळी पोर्तुगालला अनुक्रमे उपांत्यपूर्व फेरी आणि साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला, त्यामुळेच यंदा तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रोनाल्डोच्या जोरावर पोर्तुगालचे लक्ष विश्वचषकावर लागले आहे.

Web Title: Who will Star in this FIFA World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.