तिसऱ्या स्थानासाठी कुणाचे पारडे जड? क्रोएशिया-मोरोक्को यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ लढत आज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:02 AM2022-12-17T06:02:09+5:302022-12-17T06:02:19+5:30
क्रोएशिया संघ मागच्या विश्वचषकाचा उपविजेता आहे. यावेळी उपांत्य सामन्यात त्यांना अर्जेंटिनाने ३-० ने नमविले.
दोहा : फिफा विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत झालेले क्रोएशिया आणि मोरोक्को संघ शनिवारी तिसऱ्या स्थानावर दावा सांगण्यासाठी एकमेकांविरुद्ध झुंजणार आहेत. रात्री ८.३० वाजल्यापासून हा सामना खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविला जाईल. क्रोएशियाचा अर्जेंटिनाकडून आणि मोरोक्कोचा फ्रान्सकडून उपांत्य सामन्यात पराभव झाला होता.
क्रोएशिया संघ मागच्या विश्वचषकाचा उपविजेता आहे. यावेळी उपांत्य सामन्यात त्यांना अर्जेंटिनाने ३-० ने नमविले. मोरोक्को पहिल्यांदा उपांत्य सामना खेळला. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघाच्या खेळाची चर्चा जगातील चाहत्यांच्या ओठांवर आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात पोर्तुगालचा स्वप्नभंग करीत त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. तथापि गतविजेत्या फ्रान्सने त्यांची विजयी घोडदौड २-० ने रोखली.
आफ्रिकेतील संघांविरुद्ध क्रोएशियाचे रेकॉर्ड दमदार आहेत. याआधीच्या तीन विश्वचषकांत कोणत्याही आफ्रिका संघाला त्यांच्यावर गोल नोंदविता आलेला नव्हता. २०१४ ला क्रोएशियाने कॅमेरूनचा ४-० ने आणि २०१८ ला नायजेरियाचा २-० ने पराभव केला. यंदा मोरोक्कोविरुद्ध त्यांची लढत अनिर्णित राहिली.
विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या १९ पैकी कोणताही सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेला नाही. या दरम्यान केवळ एकदा १९८६ ला फ्रान्स-बेल्जियम यांच्यात अतिरिक्त वेळेपर्यंत खेळ झाला होता.
फिफा विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात दहा वेळा युरोपियन संघांनी बाजी मारली. क्रोएशिया विश्वचषकात दुसऱ्यांदा तिसऱ्या स्थानासाठी खेळणार असून, १९९८ ला त्यांनी नेदरलँड्सचा २-१ ने पराभव केला होता.
साखळीतही भिडले दोन्ही संघ
क्रोएशिया आणि मोरोक्को विश्वचषकाच्या एकाच गटात होते. त्यांच्यात झालेला साखळी सामना अनिर्णित सुटला होता. एफ गटात या दोन संघांशिवाय बेल्जियम तसेच कॅनडा यांचा समावेश होता. मोरोक्कोने बेल्जियम आणि कॅनडावर मात करीत गटात अव्वल स्थान मिळविले होते. क्रोएशियाचा बेल्जियमविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला; तर कॅनडाला पराभूत करीत त्यांनी राउंड ऑफ १६ मध्ये स्थान मिळविले होते.