जर्मनी-कोस्टारिका सामन्यात महिला पंच : झांबियाच्या ग्लॅडीज लेग्वेला मिळाला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:51 AM2017-10-09T00:51:21+5:302017-10-09T00:51:27+5:30
फुटबॉलच्या मैदानात पुरुषांचे वर्चस्व होते. पण आता काळ बदलला. खेळाडूंपासून एक सामनाधिकारी बनण्यापर्यंत महिलाही मागे नाहीत.
सचिन कोरडे
फुटबॉलच्या मैदानात पुरुषांचे वर्चस्व होते. पण आता काळ बदलला. खेळाडूंपासून एक सामनाधिकारी बनण्यापर्यंत महिलाही मागे नाहीत. ‘फिफा’नेसुद्धा महिलांना प्राधान्य देत जगातील सर्वाेत्तम सात महिला पंचांची निवड ही भारतात सुरू असलेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी केली. त्यातील झांबियाची ग्लॅडीज लेग्वे ही जेव्हा फातोर्डा (गोवा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उतरली तेव्हा कॅमेºयाचे फ्लॅश सतत तिच्यावर पडत होते. तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. फातोर्डा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच (आॅफिशियल) म्हणून उतरणारी ती पहिली महिला ठरली.
शनिवारी झालेल्या जर्मनी-कोस्टारिका या सामन्यात चौथी पंच म्हणून ग्लॅडीज लेग्वे हिने काम पाहिले. १७ वर्षांखालील विश्वचषकाच्या निमित्ताने ती प्रथमच भारतात आली आहे. ३५ वर्षीय लेग्वे हिने १७ वर्षांखालील महिला विश्वचषकातही उत्कृष्ट काम केले होते. कित्वे (झांबिया) येथे जन्मलेल्या लेग्वे हिने १९९८ पासून आॅफिशियल पंच म्हणून काम सुरू केले. २००२ मध्ये तिला फिफाच्या पंच पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आले. कोस्टारिका येथे २०१२ मध्ये झालेल्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषकासाठी ३० आॅफिशियल्सची निवड करण्यात आली होती. त्यात आफ्रिका खंडातील केवळ दोघी होत्या. त्यात लेग्वे हिचा समावेश होता. ब्राझील येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेतही तिने काम पाहिले आहे. आॅलिम्पिकस्पर्धेत मिळालेली संधी आपल्यासाठी आश्चर्यकारक होती. आताच्या निवडीने मी खूप आनंदी आहे. फिफाकडून आमंत्रण येईल, अशी अपेक्षा नव्हती, असे टिष्ट्वट करीत तिने फिफाला धन्यवाद दिले आहेत.
स्पर्धेतील महिला पंच-
भारतात सुरू असलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी मुख्य पंचांना सहकार्य करण्यासाठी ७ महिलांची निवड करण्यात आली. त्यात ओके री ह्यांग (कोरिया), ग्लॅडीज लेग्वे (झांबिया), कॅरोल अॅनी चिनार्ड (कॅनडा), क्लाउडिया अम्पारिएज (उरुग्वे), अॅना मॅरी किंघले (न्यूझीलंड), कॅटरिना मोन्झूल (युक्रेन) आणि इस्थेर स्टॅब्ली (स्वित्झर्लंड) यांचा समावेश आहे.