Fifa World Cup 2018: 'तो' लंडनहून रशियाला आला अन् १३ जणांचे केस कापून गेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:11 IST2018-06-20T16:11:00+5:302018-06-20T16:11:00+5:30
हिल्टन गार्डन इन्स जिमच्या बाहेर अक्षरशः फ्रान्सच्या खेळाडूंची रांग लागल्याचं चित्र होतं.

Fifa World Cup 2018: 'तो' लंडनहून रशियाला आला अन् १३ जणांचे केस कापून गेला!
मॉस्कोः फुटबॉलच्या मैदानातील थरार जितका लक्षवेधी असतो, तितकीच फुटबॉल स्टार्सची फॅशनही चर्चेचा विषय असते. त्यांची हेअरस्टाइल, दाढी, हातावरचे टॅटू, त्यांच्या सिग्नेचर पोझ यावर चाहत्यांचं बारीक लक्ष असतं आणि म्हणूनच फुटबॉल स्टारही आपल्या स्टाइलबद्दल अत्यंत काटेकोर, दक्ष असतात. फ्रान्सचा आधारस्तंभ पॉल पॉग्बाही त्यांच्यापैकीच एक. त्याच्यामुळे त्याच्या लंडनच्या हेअरस्टाइलिस्टला रशियात भलतीच 'लॉटरी' लागली. तो एकाचे केस कापायला म्हणून गेला आणि १३ जणांचं 'कटिंग' करून आला.
अहमद अल्सानवी हा लंडनमधील २६ वर्षांचा तरुण पॉग्बाचा हेअरस्टायलिस्ट आहे. त्याला पॉग्बानं रशियाला बोलावून घेतलं होतं. तो येतोय हे कळताच फ्रान्सच्या अन्य १२ शिलेदारांनीही आपापली केशरचना आरशात पाहिली आणि अल्सानवी आल्यावर डोकी त्याच्या हाती सोपवली. हिल्टन गार्डन इन्स जिमच्या बाहेर अक्षरशः फ्रान्सच्या खेळाडूंची रांग लागल्याचं चित्र होतं. त्यात बार्सिलोनाचा सॅम्युएल उमटिटी, ऑसमाने डेम्बेले, चेल्सीचा एनगोलो कान्टे, प्रेसनेल किम्पेम्बे हे स्टारही होते.
या रशिया दौऱ्यानंतर आपला बिझनेस वेगाने वाढेल, याबद्दल अल्सानवीला खात्रीच आहे. फक्त फ्रान्सच नव्हे, तर इतर संघाचे खेळाडूही आपल्याला हेअरस्टाईलसाठी बोलावतील, असं तो विश्वासाने सांगतो. आपल्या लोकप्रियतेचं श्रेय तो पॉग्बाला देतो. एकेकाळी डेव्हिड बॅकहमच्या हेअरस्टाइलची फुटबॉल वर्तुळात चर्चा असायची. त्याची जागा आज पॉग्बानं घेतली आहे, असं तो आनंदानं सांगतो.