विश्वचषक फुटबॉल : नेमारमुळे ब्राझील भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:32 AM2018-06-10T03:32:34+5:302018-06-10T03:41:49+5:30
विश्वचषकाआधी नेमारचे धडाक्यात पुनरागमन ब्राझील संघासाठी शुभसंकेत मानले जात आहेत. गतविजेता जर्मनी आणि अर्जेंटिना संघ गेल्या काही महिन्यांपासून ‘आॅफ फॉर्म’ आहेत. त्यांची तयारीदेखील तितकी चांगली झालेली नाही.
मॉस्को - विश्वचषकाआधी नेमारचे धडाक्यात पुनरागमन ब्राझील संघासाठी शुभसंकेत मानले जात आहेत. गतविजेता जर्मनी आणि अर्जेंटिना संघ गेल्या काही महिन्यांपासून ‘आॅफ फॉर्म’ आहेत. त्यांची तयारीदेखील तितकी चांगली झालेली नाही.
मागच्या आठवड्यात क्रोएशियाविरुद्ध नेमारने ४५ मिनिटे शानदार खेळ केला. पायाच्या दुखापतीमुळे तीन महिने बाहेर राहिलेल्या नेमारने फिटनेसची चिंता नको, असे चाहत्यांना दाखवून दिले. २६ वर्षांच्या नेमारने फिटनेस सिद्ध केल्यानंतर १७ जून रोजी स्वित्झर्लंडविरुद्ध विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात स्वत:च्या खास शैलीत तो खेळताना दिसेल. नेमारबाबत ब्राझीलचे कोच टिटे म्हणाले ‘पुनरागमनानंतर पहिल्या सामन्यात मला त्याच्याकडून मंद खेळाची अपेक्षा होती, पण तो सुसाट खेळला.
त्याचा खेळ खरोखर वाखाणण्याजोगा होता.’ टिटे यांच्या मार्गदर्शनात ब्राझील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पाचवेळच्या या विश्वविजेत्याला रोखायचे कसे, ही डोकेदुखी अन्य संघांसाठी कायम आहे. टिटे यांच्या नेतृत्वात संघाने मेलबोर्नमध्ये केवळ अर्जेंटिनाला सामना गमावला.
पायाच्या दुखापतीमुळे आठ महिने संघाबाहेर राहिलेला मॅन्युएर नूएर याचे पुनरागमन जर्मनीचा उत्साह वाढविणारे आहे. तरीही जोकीम ल्यू याच्या संघापुढे मोठे आव्हान असेल ते जेतेपद टिकविण्याचे. प्रतिभावान फ्रान्सचा संघ अनेक आशा बाळगून रशियात दाखल होत आहे. पण खेळाडूंची शक्ती ओळखण्यात संघ व्यवस्थापनाला अद्यापही यश आलेले नाही.
अर्जेंटिना तुल्यबळ संघच
दुसरीकडे अर्जेंटिनाच्या तयारीला इस्रायलविरुद्धचा मैैत्री सामना रद्द झाल्यामुळे धक्का लागला. गोलकीपर सर्गियो रोमेरो आधीच बाहेर झाला तर मॅन्युएल लांजिनी याला दुखापत झाली आहे. पण संघ व्यवस्थापक ओमार साऊतो यांच्या मते, संघ अद्याप तुल्यबळ आहे. ते पुढे म्हणाले,‘मी पाच विश्वचषकाचा साक्षीदार आहे. सध्याचा माझा संघ सर्वोत्कृष्ट आहे.
तासाभरात एक लाख २० हजार तिकिटांची विक्री
नवी दिल्ली : रशियात १४ जूनपासून सुरू होत असलेल्या फिफा विश्वचषकाची अतिरिक्त तिकिटे उपलब्ध होताच अवघ्या तासाभरात एक लाख २० हजार तिकिटांची विक्री झाली आहे. आता काही निवडक सामन्यांची अतिरिक्त तिकिटे शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली. फुटबॉल चाहत्यांना तिकिटांची उपलब्धता फिफा डॉट कॉम आणि तिकीट वेबसाईटवर दिली जात असून तिकिटे १५ जुलैपर्यंत उपलब्ध असतील.
फिफा विश्वचषकाच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाल्यापासून जगभरात आतापर्यंत २५ लाखांवर तिकिटे विकली गेली आहेत. ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत त्यांनीही आशा सोडू नये. वेबसाईटकडे लक्ष ठेवल्यास अतिरिक्त तिकिटे उपलब्ध होऊ शकतात, असे आयोजकांचे मत आहे. तिकीट मिळविणाऱ्या चाहत्यांना सामना पाहायचा नसल्यास त्यांनी वेबसाईटच्या माध्यमातून तिकिटे विकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या सामन्यांची तिकिटे सध्या उपलब्ध नाहीत, ती नंतरही उपलब्ध होऊ शकतात. फिफा डॉट कॉमच्या माध्यमातून आधी तिकीट मिळविणारे चाहते आपली तिकिटे इतरांना विकू शकतात. फिफा विश्वचषकाच्या तिकीटविक्रीसाठी फिफा डॉट कॉम आणि तिकीट्स हीच एकमेव अधिकृत वेबसाईट आहे. फिफा विश्वचषकाची अवैध विक्री झाल्याचे आढळून आल्यास त्याला आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सावध करण्यात आले आहे.
जर्मनीचा सौदी अरबवर विजय, वर्नर चमकला
लेवरकुसेन(जर्मनी): टिमो वर्नरच्या शानदार खेळाच्या बळावर गत विजेत्या जर्मनीने विश्वचषकापूर्वीच्या अखेरच्या सराव सामन्यात शनिवारी सौदी अरब संघावर २-१ ने विजय साजरा केला. पाच सामन्यात जर्मनीचा हा पहिला विजय आहे. वर्नरने सामन्याच्या आठव्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला आघाडी मिळवून दिली.
मध्यंतराआधी ४३ व्या मिनिटाला उमर होवसावी याच्या आत्मघातकी गोलमुळे जर्मनीची आघाडी २-० अशी झाली. सामन्यात वर्नर ६२ व्या मिनिटापर्यंत मैदानात फॉर्ममध्ये खेळत होता. सौदी संघाने अखेरच्या काही मिनिटात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, पण विजयासाठी हे प्रयत्न अपुरे पडले.
८५ व्या मिनिटाला मोहम्मद अल साहलवी याची किक बार्सिलोनाचा गोलकिपर आंद्रे स्टेगेन याने थोपवून लावली. चेंडू रिबाऊंड होताच तौसिर अल जास्मिन याने चेंडू गोलजाळीत ढकलून पराभवाचे अंतर कमी केले.
सामन्याच्या अतिरिक्त वेळेत सौदीला बरोबरीची संधी होती पण चेंडू गोलपोस्टवर धडकून परत आला. विश्वचषकाच्या अ गटात असलेल्या जर्मनीचा पहिला सामना १७ जून रोजी मेक्सिकोविरुद्ध होईल. सौदी अरब संघाला गुरुवारी यजमान रशियाविरुद्ध खेळावे लागेल. (वृत्तसंस्था)