FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 05:19 AM2017-10-08T05:19:11+5:302017-10-08T07:06:39+5:30
शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.
- सचिन कोरडे
मडगाव : शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. कोस्टारिका संघ २-१ ने पराभूत झाला. हा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.
सामन्याच्या सुरुवातीची दहा मिनिटे कोस्टारिका संघाने गाजवली. त्यांना बºयाच संधी मिळाल्या होत्या. मात्र, गोल नोंदवता आला नाही. चौथ्या मिनिटाला कोस्टारिकाची संधी थोडक्यात हुकली. लुका प्लोंगमान्न हा पास रोखण्यात अपयशी ठरला. दहा मिनिटांनंतर मात्र जर्मनीने कमालीची आक्रमकता दाखवली. २१ व्या मिनिटाला कर्णधार जॉन अर्पने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर कोस्टारिका-जर्मनीतील आघाडीपटूंमध्ये बरीच चकमक पाहायला मिळाली. ६१ व्या मिनिटाला आंद्रेस गोमेज याने एकाकीपणे चेंडूला गोलजाळ्याकडे नेत शानदार गोल नोंदवला. या गोलनंतर कोस्टारिका संघात जोश भरला होता. सामना संपण्यास अवघे एक मिनिट शिल्लक असताना अवुकू याने विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदवला.
शांत झोप घेणार : क्रिस्टियन कुक
कोस्टारिका संघाविरुद्ध आम्ही विजय मिळवला असला तरी साजेशी कामगिरी करू शकलो नाही. पहिल्या दहा मिनिटांत आम्ही ढिसाळ खेळ केला. गेल्या आठवडाभरापासून आम्ही गोव्यात आहोत. आराम केलाच नाही. आता इराणविरुद्ध सामन्यापूर्वी आम्ही थोडी विश्रांती घेऊ, असे जर्मनीचे प्रशिक्षक कुक यांनी विजयानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
इराणचा गिनीवर विजय
इराणने दहा खेळाडूंसह खेळणाºया गिनीचा ३-१ गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी १७ वर्षांखालील विश्वचषकात ‘क’ गटात शानदार सुरुवात केली. पहिल्या सत्रात बचावात्मक खेळ करणाºया इराणने दुसºया सत्रात तीन गोल नोंदवले. हे गोल अलाहयर सय्यद (५९ वा मिनिट), मोहम्मद शरीफी (७०) व बदली खेळाडू करीमी सय्यद (९०) यांनी केले.
गिनी संघाकडून एकमेव गोल इंजुरी वेळेत नोंदवला गेला. हा गोल फांद्जे टोरी याने केला. चेरिफ कमारा याने फाउल केला त्यामुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे गिनिला दुसºया सत्रात दहा खेळाडूंसह खेळावे लागले. या फाउलमध्ये इराणला पेनल्टी किक मिळाली. ज्यावर त्यांनी ७० व्या मिनिटाला गोल नोंदवला.