युवा भारतीय खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवावी, नवी मुंबईत फिफा युवा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:26 AM2017-09-07T00:26:59+5:302017-09-07T00:27:10+5:30
फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद निभावणे भारतासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेतून खेळाडूंनी जगाला स्वत:ची गुणवत्ता दाखवावी.
मुंबई : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद निभावणे भारतासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेतून खेळाडूंनी जगाला स्वत:ची गुणवत्ता दाखवावी. १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा तुमच्यासाठी मोठा मंच आहे, असा सल्ला फुटबॉल विश्व गाजवलेल्या दिग्गज खेळाडूंनी भारतीय युवा खेळाडूंना दिला.
६ आॅक्टोबरपासून भारतात होत असलेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण बुधवारी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियवर करण्यात आले. या वेळी, कार्लोस वाल्डेर्रमा (कोलंबिया), फर्नांडो मॉरिएंट्स (स्पेन), मार्सेल डीसेलै (१९९८ विश्वचषक विजेता फ्रान्स), जॉर्ज कॅम्पोस (मेक्सिको) आणि इम्म्युन्युएल अमुनेके (नायजेरीया) या दिग्गज फुटबॉलपटूंची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे, या वेळी फिफा लिजेंड्स विरुद्ध इंडियन आयकॉन्स असा प्रदर्शनीय सामनाही खेळविण्यात आला.
कोलंबियाचा दिग्गज कार्लोसने सांगितले की, ‘भारतीय १७ वर्षांखालील संघासाठी ही स्पर्धा खूप मोठी संधी आहे. जर तुम्ही रियाल माद्रिद क्लबमध्ये जाण्यास उत्सुक असाल, तर ही तुमच्यासाठी एक संधीच आहे. सर्व मोठे संघ आणि एजंटच्या नजरा तुमच्यावर असतील. त्यामुळे या स्पर्धेचा आनंद घ्या आणि ही संधी साधण्याचा प्रयत्न करा. आपली गुणवत्ता दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.’
त्याचप्रमाणे, ‘मी या युवा भारतीय खेळाडूंना खेळताना पाहिलेले नाही. यजमान म्हणून ते पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. याद्वारे आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्याची संधी युवांना असेल. युवा खेळाडूंना स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. येथून त्यांचा प्रवास सुरु होत असून जर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आणि सांघिक खेळ करण्यात यशस्वी झाले तर ते साखळी फेरीत चांगली कामगिरी करू शकतील,’ असा विश्वास नायजेरियाचा दिग्गज इम्म्युन्युएलने व्यक्त केला.
१९९८ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या फ्रान्सच्या संघातील स्टार खेळाडू मार्सेलने म्हटले की, ‘भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार असून, हे खूप विशेष आहे. त्यांना शारीरिक आणि मानसिकरीत्या यासाठी तयार राहावे लागेल. कारण, घरच्या मैदानावर खेळण्याचा दबाव झेलणे खूप कठीण असते. आम्ही १९९८ मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरलो, कारण त्या दबावाला आम्ही सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलून घेतले होते.’