१ लाख २१ हजारांचा दारूसाठा जप्त; १० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:06+5:30
राजम्मापल्ली येथे काही जण दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेकडून मुक्तिपथ तालुका चमूला बुधवारी मिळाली. त्यांनी याच दिवशी सकाळी पाच जणांच्या घरी धाड टाकून तपासणी केली. यावेळी चार जणांच्या घरी मुद्देमाल सापडला. तीन घरी एकूण ३५० लिटर गुळाचा व मोहाचा सडवा तर एका घरी ६० लिटर दारू सापडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील राजम्मापल्ली आणि अमरावती येथे मुक्तिपथ आणि सिरोंचा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोह व गुळाचा सडवा, दारू, गुळ, साखर असा एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राजम्मापल्ली येथे काही जण दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेकडून मुक्तिपथ तालुका चमूला बुधवारी मिळाली. त्यांनी याच दिवशी सकाळी पाच जणांच्या घरी धाड टाकून तपासणी केली. यावेळी चार जणांच्या घरी मुद्देमाल सापडला. तीन घरी एकूण ३५० लिटर गुळाचा व मोहाचा सडवा तर एका घरी ६० लिटर दारू सापडली. हा सर्व २३ हजारांचा माल जप्त करून मुक्तिपथ तालुका चमूने सिरोंचा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या गावी पोहोचून हा मुद्देमाल नष्ट केला आणि चौघांवर गुन्हे दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक शीतल धवील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
तालुक्यातील अमरावती येथेही काही जण दारू गाळून त्याची विक्री करीत असल्याची माहिती शुक्रवारी मुक्तिपथ तालुका चमूला मिळाली. त्यांनी सिरोंचा पोलिसांना याची माहिती दिली. एकत्रितपणे १० घरी धाड टाकली असता सहा घरी एकूण १५ ड्राम गुळाचा व मोहाचा सडवा, ३० लिटर मोहफूल दारू, २० किलो गूळ आणि ३० किलो साखर, असा एकूण ९८ हजाराचा मुद्देमाल सापडला. हा संपूर्ण साठा पोलिसांनी नष्ट केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. बीट अंमलदार बोरगडे, गुम्मला यांनी ही कारवाई केली.
सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही कारवाया पोलिसांनी केल्या. पोलिसांनी एकूण १ लाख २१ हजाराचा साठा नष्ट केला. मुक्तिपथ संघटक सुनीता भगत आणि प्रेरक संतोष चंदावार दोन्ही कारवाईदरम्यान हजर होते.
मुलेचरा तालुक्यात धडक कारवाईची गरज
मुलचेरा तालुक्याच्या लगाम परिसरासह बऱ्याच ठिकाणी मोहफूल दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खुलेआम विक्री होत आहे. या दारूविक्रीमुळे महिला व सुज्ञ नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व मुक्तिपथने संयुक्तरित्या लगाम परिसरासह मुलचेरा तालुक्यात धडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.