दारूसह १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:52+5:302021-06-19T04:24:52+5:30
गडचिरोली : चांदाळा-कुंभी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत १ लाख ८४ हजार ५०० ...
गडचिरोली : चांदाळा-कुंभी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मोहसडवा, दारू व साहित्य नष्ट केले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिराज आबाजी शेरकी (३० वर्षे), रा. चांदाळा टोली, असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस व मुक्तिपथ चमूने चांदाळा-कुंभी परिसरातील नाल्यालगत विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी हातभट्टीवर मोहफुलाची दारू गाळताना योगिराज आबाजी शेरकी हा दारूविक्रेता मिळून आला. सदर आरोपीला ताब्यात घेऊन घटनास्थळावरील १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मोह सडवा, दारू, ड्रम, कॅन व दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. या आरोपीविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, हवा गोन्नाडे, दुर्गे, हलामी व मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.