सिरकोंडा येथे बैलबंडीसह १ लाख ९४ हजारांचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 01:44 AM2017-03-30T01:44:58+5:302017-03-30T01:44:58+5:30
बामणी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सिरकोंडा येथे दोन बैलबंडीमध्ये १२ नग साईज सागवान १ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे जप्त करण्यात आले.
चार बैल जप्त : तस्कराच्या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी
बामणी : बामणी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सिरकोंडा येथे दोन बैलबंडीमध्ये १२ नग साईज सागवान १ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे जप्त करण्यात आले. २८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता वन विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. यात १२ नग सागवान कटसाईज आकाराचे ३४ हजार रूपये व चार बैल, दोन बैलबंडी असा एकूण १ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दोन वनकर्मचारी तस्कराच्या हल्ल्यात जखमी झाले.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वनस्करी सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी वनरक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला जबर जखमी करण्यात आले. याप्रकरणी सुरेश चिन्नगैरय्या कुमरी, प्रभाकर बापू दुर्गम, गंगाराम गोवारी दुर्गम, कोंडागोर्ला राजलिंगू शंकर या चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून हे फरार आहेत.
सदर कारवाईसाठी बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी के. पी. गौरकर, वनपाल एस. ए. दांडेवार, वनरक्षक बी. पी. सोनकांबळे, वनरक्षक पी. आर. पाटील, वनरक्षक एस. यू. खोब्रागडे, वनरक्षक आर. डी. जोरताडे, वाहनचालक नीलेश चहाने, वनमजूर रवींद्र धर्मी यांनी परिश्रम घेतले. सदर कारवाई सिरकोंडा येथील कक्ष क्र. ११ पीएफ परिसरात घडली आहे. या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वनाधिकारी के. पी. गैरकर यांनी दिली आहे. सिरोंचा तालुक्यात नेहमीच वनतस्करांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असतात. (वार्ताहर)