१० उमेदवारांवर होणार कारवाई
By admin | Published: February 16, 2017 01:49 AM2017-02-16T01:49:39+5:302017-02-16T01:49:39+5:30
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर
तीन वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी : न. प. निवडणुकीचा खर्च सादर केला नाही
गडचिरोली : निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांना पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जारी केले आहेत. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिका निवडणूक लढविणाऱ्या १० उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही. त्यामुळे या उमेदवारांवर तीन वर्ष निवडणूक बंदीची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येणार आहे, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१) (ड) नुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर न केल्यास सदस्य म्हणून निवड झाली असेल तर अपात्र ठरविणे तसेच पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणे, अशी तरतूद आहे.
दोन्ही नगर पालिका मिळून निवडणूक लढविणाऱ्या १० उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर केला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
हे उमेदवार आहेत कारवाईस पात्र
नगर पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांमध्ये देसाईगंज नगर परिषदअंतर्गत आकरे राजू यशवंत व चिंचेकार कल्पना पंढरी या दोघांचा समावेश आहे. गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या दिवटे अरूणा रामदास, मडावी योगेश रमेश, सावसाकडे मुकेश गोविंदराव, कुमरे विठ्ठल खुशाल, आत्राम अविनाश मोतीराम, गुरूनुले मीनाक्षी गजानन, उसेंडी बबीता मुकेश, बारापात्रे रेखा प्रभाकर या दहा उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्चाचा हिशेब प्रशासनाला दिला नाही. त्यामुळे हे दहा उमेदवार तीन वर्ष निवडणूक बंदीच्या कारवाईस पात्र असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.