१० जटील शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:26 PM2018-08-27T22:26:34+5:302018-08-27T22:26:58+5:30
स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मे पासून जुलै २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त १० महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजाराने ग्रस्त १० महिलांना जीवनदान मिळाले. सदर १० मोठ्या व जटील शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम व जनरल सर्जन डॉ.जयंत पर्वते यांच्या पुढाकाराने पार पडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मे पासून जुलै २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त १० महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजाराने ग्रस्त १० महिलांना जीवनदान मिळाले. सदर १० मोठ्या व जटील शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम व जनरल सर्जन डॉ.जयंत पर्वते यांच्या पुढाकाराने पार पडल्या आहेत.
सदर महिला व बाल रुग्णालयात गर्भवती महिलांवर तसेच गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त महिलांवर औषधोपचार केला जातो. याशिवाय १२ वर्षांखालील मुला, मुलींवरही या रुग्णालयात औषधोपचार केला जात आहे. सदर रुग्णालयात तांबी बसविणे तसेच कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या या रुग्णालयात गर्भवती महिला, गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त महिला व १२ वर्षांखालील मुला- मुलींची औषधोपचारासाठी मोठी गर्दी होत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत गर्भाशय व इतर रोगांच्या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी या रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रुग्ण रेफर केले जात आहेत. कारण राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित आहे.
तीन महिन्यांत ३३० सिझर प्रसूती
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात १० मे २०१८ पासून रुग्णभरतीची सुविधा उपलब्ध झाली आहे. मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर रुग्णालयात येथील डॉक्टरांच्या चमूने तब्बल ३३० गर्भवती महिलांची सिझर प्रसूती केली आहे. याशिवाय या रुग्णालयात अनेक नार्मल प्रसूतीही झाल्या आहेत. सदर महिला रुग्णालयात गडचिरोली शहर, तालुक्यासह इतर तालुक्यातून तसेच इतर जिल्ह्यातून गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल होत असतात. येथे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी चमू असल्याने महिला रुग्णांचा या रुग्णालयाकडे कल वाढला आहे. सर्व तपासण्याही येथे केल्या जात आहेत.
दररोज १५० वर रुग्ण भरती
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात १०० खाटांची सुविधा आहे. मात्र जुलै महिन्यात या रुग्णालयात दररोज सरासरी १६३ रुग्ण भरती झाले होते. रविवारी भरती असलेल्या रुग्णांची नोंद २५० होती. येथील खाटा कमी पडत असल्याने अनेक महिला व बाल रुग्णांना जमिनीवर गादीवर झोपून औषधोपचार घ्यावा लागत आहे. उपलब्ध असलेले मनुष्यबळही आरोग्य सुविधेसाठी कमी पडत आहे. या बाबीचा विचार करून शासनाने येथे आवश्यक मनुष्यबळ व खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.