आलापल्लीला १० लाखांचे आरओ व वाॅटर एटीएम मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:19+5:302021-06-03T04:26:19+5:30
कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली. याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार ...
कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली. याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील आहे. सर्व नागरिकांनी लस घ्यावी व कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे; परंतु काही लोकांकडून पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे लोक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
अशाही स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आलापल्लीला जिल्हा खनिकर्म निधींतर्गत १० लाखांचे आरओसोबत वाॅटर एटीएम मंजूर केले. पुढील कार्यवाही ग्रामीण पाणीपुरवठा विभाग लवकरच पूर्ण करणार आहे.
आलापल्ली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका उइके यांच्यासह आरोग्य विभागाच्या चमूने स्थानिक लोकप्रतिनीधींना विश्वासात घेऊन लसीकरण केले. गटविकास अधिकारी किशोर के. गज्जलवार, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्याशी चर्चा करून सरपंच, पाेलीस पाटील व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावामध्ये लसीकरण करण्यात आले.
बाॅक्स
इतर गावांनीही प्रयत्न करावेत
गावातील लसीकरणाच्या कामाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही समाधान व्यक्त केले. तालुक्यातील ज्या गावांमध्ये जास्त प्रमाणात लसीकरण आहे, अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरओ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर गावांनीही जास्तीत जास्त लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सीईओ कुमार आशीर्वाद यांनी केले.