१० टक्के वृक्ष करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:40 PM2017-11-27T23:40:10+5:302017-11-27T23:40:40+5:30
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १० लाख ४४ हजार २३६ वृक्षांची लागवड करण्यात आली होती.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १० लाख ४४ हजार २३६ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. वन विभागाने आॅक्टोबर महिन्यात सर्व्हेक्षण केले असता, सुमारे ९७ हजार १४२ वृक्ष करपली तर ९ लाख ४७ हजार ९४ वृक्ष जीवंत आढळली आहेत. करपलेल्या वृक्षांची टक्केवारी ९.३१ एवढी आहे.
विद्यमान शासनाने दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जुलै २०१६ मध्ये राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होत. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५ लाख ४८ हजार ८२९ वृक्षांची लागवड झाली. २०१७ मध्ये राज्यात चार कोटी वृक्ष लागवड झाली. गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १० लाख ४४ हजार २३६ वृक्ष लावण्यात आले.
वन विभागाकडे सर्वाधिक जागा व मनुष्यबळ उपलब्ध असल्याने दरवर्षीच वन विभागाला अधिकचे उद्दिष्ट दिले जाते. इतर यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कमी केले तर त्याचा भार वन विभागावर पडतो. त्यामुळे उद्दिष्टामध्ये आणखी वाढ होते.
गडचिरोली जिल्ह्यात वनजमिनीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याला अधिकचे उद्दिष्ट दिले जाते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वन विभागाच्या कर्मचाºयांची संख्या सुध्दा गडचिरोली जिल्ह्यात अधिक आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुध्दा अधिक आहे. त्यामुळे जमिनीमध्ये उन्हाळ्यातही ओलावा राहत असल्याने पाणी न देताच वृक्ष जीवंत राहतात. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील जीवंत वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
इतर यंत्रणांचे वृक्ष लागवडीनंतर भुईसपाट
वृक्ष लागवडी सप्ताहादरम्यान वन विभागाबरोबरच इतर प्रशासकीय यंत्रणा वृक्षांची लागवड करतात. वृक्ष लागवड होऊन त्याचा फोटो वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सदर झाडाकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या यंत्रणांनी झाडे लावली आहेत. त्यापैकी किती झाडे जीवंत आहेत. याची माहिती भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. मात्र या सॉफ्टवेअरमध्ये एकही यंत्रणा जीवंत वृक्षांची माहिती भरत नाही. त्यामुळे नेमकी किती वृक्ष जीवंत आहेत, हे कळत नाही. ग्रामपंचायत दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये दुसºया वृक्षाची लागवड करते. यावरून किती झाडे जीवंत राहतात. याचा अंदाज येण्यास मदत होते. रस्त्याच्या सभोवतालची झाडे कुंपणाशिवाय जीवंत राहू शकत नाही. याची कल्पना ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र कठडे करण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करते. एकंदरीतच इतर यंत्रणांनी लावलेल्या झाडांपैकी निम्मी सुध्दा झाडे जीवंत नसल्याचे दिसून येते. लावलेले वृक्ष जगविण्याची सक्ती करून वन विभागाप्रमाणेच आढावा घेण्याची मागणी होत आहे.
मागील वर्षीचे १३ लाख वृक्ष जीवंत
२०१६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वन विभागामार्फत १५ लाख ४८ हजार ८२९ वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १२ लाख ५४ हजार ९८१ वृक्ष अजुनही जीवंत आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८१.०२ एवढे आहे. आलापल्ली वन विभागाने ७ लाख ५० हजार ८७ वृक्ष लावले होते. त्यापैकी ५ लाख ३४ हजार ३४३ वृक्ष जीवंत आहेत. भामरागड वन विभागातील ५ हजार ७०० वृक्षांपैकी २ हजार ९५१ वृक्ष जीवंत आहेत. सिरोंचा वन विभागातील २६ हजार ७१४ वृक्षांपैकी २३ हजार ३५९, गडचिरोलीतील २ लाख ११ हजार ४०० वृक्षांपैकी १ लाख ८१ हजार १४१, देसाईगंज वन विभागातील ५ लाख ५४ हजार ९२८ वृक्षांपैकी ५ लाख १३ हजार १८७ वृक्ष जीवंत आहेत.