१० हजार घरकूल झाले प्रकाशमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:36 AM2018-11-07T00:36:03+5:302018-11-07T00:36:22+5:30
सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे.
जगाच्या विकासात विजेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हे जरी मान्य केले तरी गडचिरोली जिल्ह्यातील काही गावे विजेपासून वंचित आहेत. तर गरीब नागरिक वीज पुरवठ्यासाठी पैसे भरून वीज पुरवठा घेऊ शकत नाही. अशा कुटुंबांना वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब नागरिकांना वीज विभागाकडून मोफत वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील ९ हजार ८६९ कुटुंबांना विजेची सेवा उपलब्ध झाली आहे. यात आलापल्ली विभागातील सर्वाधिक ९ हजार ३२० कुटुंब आहेत. तर गडचिरोली विभागातील ५४९ कुटुंबांचा समावेश आहे. शासनाच्या मदतीने महावितरणने गरीब नागरिकांना वीज पुरवठा उपलब्ध करून देत सामाजिक दायित्त्व पार पाडले आहेत.
आलापल्ली विभागांतर्गत एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी हे तालुके येतात. या तालुक्यांमध्ये ९० टक्के क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे वीज लाईन टाकताना फार मोठी अडचण निर्माण होते. या बाबीवर मात करीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांनी दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचविली. आता या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा दिला जात आहे. विशेष म्हणजे या कुटुंबांना दिवाळीपूर्वीच वीज जोडणी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे.
काही प्रमाणात साहित्यही मोफत
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणीचा लाभ देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क आहे. तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बिल भरणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चारर्जिंग पार्इंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना आदी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांनाही वीज पुरवठा दिला आहे.