आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:24 AM2018-07-21T00:24:34+5:302018-07-21T00:26:52+5:30
मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरून तिथे असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश समय्या मडे (२२) रा.वियमपल्ली, ता.सिरोंचा असे आरोपी युवकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरून तिथे असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश समय्या मडे (२२) रा.वियमपल्ली, ता.सिरोंचा असे आरोपी युवकाचे नाव आहे.
२९ एप्रिल २०१६ या दिवशी ८ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी नागेश मडे हा मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. तिला आतील खोलीत नेऊन अतिप्रसंग केला. शिवाय झालेल्या प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास जिवानिशी ठार करण्याची धमकीही दिली. तिने आपल्या आईला आपबिती सांगितली.
आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी नागेश मडे याच्यावर भादंवि कलम ३७६ (२), ५०६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला.
तत्कालिन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने बचाव पक्षाचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी नागेश यास दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर निकाल प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी दिला.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.